Loading...

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डी कार्यकर्ते “राम मोहिते” निर्वतले.

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कार्यकर्ते “राम आबाराम मोहिते” यांचे शनि. दि.५ऑक्टोबर२०१९ रोजी सायंकाळी ७-००वाजता हृदयविकाराच्या झटक्याने बीड येथे निधन झाले.निधनासमयी ते ७६वर्षाचे होते.त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुले, एक मुली व नातवंडे असा परिवार आहे. बुवा साळवी यांचे ते खंदे पुरस्कर्ते होते.
बीड जिल्ह्यात त्यांनी बुवांच्या सहकार्याने कबड्डीची पाळेमुळे रोवली. किशोर व कुमार गटात बीड जिल्ह्याच्या संघांनी राज्यात आपला चांगलाच ठसा उमटविला होता. या गटात कित्येक खेळाडूंनी राष्ट्रीयस्तरावर देखील आपली छाप पाडली होती. या सर्व खेळाडूंना मोहिते यांनीच प्रोत्साहन दिले होते. जवळ-जवळ तीन तपापेक्षा जास्त काळ ते बीड जिल्हा कबड्डी असो.चे प्रमुख कार्यवाह म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेत देखील त्यांनी संयुक्त कार्यवाह व उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. निवड समिती सदस्य आणि राज्य कबड्डी संघाचे व्यवस्थापक म्हणून देखील त्यांनी कित्येक वेळा काम पाहिले होते. त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना सन १९८४-८५ सालचा “शिवछत्रपती पुरस्कार” देऊन त्यांचा सन्मान केला होता.
 दि.६ऑक्टोबर२०१९रोजी सकाळी १०-३०  वाजता भगवानबाबा प्रतिष्ठाण, बीड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी माजी मंत्री व राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सुरेश नवले, माजी आमदार राजेंद्र जगताप आणि सुनील धांडे, क्रीडा उपसंचालक वसंतराव मुळुक, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे विद्यमान कोषाध्यक्ष मंगल पांडे, लक्ष्मणराव मोहिते, कबड्डीतील कार्यकर्ते, पंच, त्यांचे चाहते व नातेवाईक त्यांना भावपूर्ण निरोप देण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुवा साळवी यांच्या माळेतील आणखी एक हिरा निखळला.
Loading...
You might also like