भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे या देशातील एक अतिशय सभ्य क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. अजिंक्य हा मातीशी जोडलेला सध्याच्या भारतीय संघातील एकमेव क्रिकेटर.
म्हणूनच या क्रिकेटरने काही महिन्यांपुर्वीच शेती क्षेत्राशी निगडीत कंपनीत मोठी गुंतवणूक केली. शेती क्षेत्राशी निगडीत कंपनीत गुंतवणूक करणारा कदाचीत तो जगातील पहिला क्रिकेटर असावा.
काल इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये रहाणेने चाहत्यांना प्रश्न विचारायला सांगितले होते. त्यात एका चाहत्याने “तुझं महाराष्ट्रातील आवडतं ठिकाण कोणतं?” असा प्रश्न विचारला होता.
क्षणाचाही विलंब न लावता अजिंक्यने ‘शिवनेरी किल्ला’ व ‘सिंहगड किल्ला’ अशी उत्तरं दिली.
जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला हा ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ’ म्हणून संपुर्ण जगात ओळखला जातो. हे ठिकाण पुण्यापासून केवळ ९४ किमी अंतरावर आहे. तर सिंहगड किल्ला हा पुण्यापासून ३५ किमी अंतरावर आहे. अनेक पर्यटकांप्रमाणेच अजिंक्यलाही महाराष्ट्रातील ही दोन ठिकाणं फार आवडतात.
अजिंक्य भारताकडून ६५ कसोटी, ९० वनडे व २० टी२० सामने खेळला आहे. तो कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे. कसोटीत त्याच्या नावावर ११ शतके असून वनडेत ३ शतके आहेत.