पुणे । म्हाळुंगे -बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र राज्य ऑलंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्वर्गीय अशोकराव कोंढरे क्रीडा नगरीमध्ये प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी पाषाण आयोजित पुरूष व महिला मॅट वरील पुणे लीग कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पुरूष विभागात वेगवान पुणे, शिवनेरी जुन्नर आणि महिला विभागात लयभारी पिंपरी चिंचवड, वेगवान पुणे या संघानी अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला.
महिलांच्या अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पहिल्या झालेल्या उपात्य फेरीच्या सामन्यात लयभारी पिंपरी चिंचवड संघाने झुंजार खेड संघावर 23-19 असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्याच्या सुरवातीपासुनच लयभारी पिंपरी चिंचवडने आक्रमक खेळ केला. तर झुंजार खेड संघाला बचाबात्मक खेळामुळे पराभवाला सामोरे जावे लागले.
मध्यंतराला लयभारी पिंपरी चिंचवड संघाकडे 11-8 अशी आघाडी होती. लयभारी पिंपरी चिंचवडच्या आफरिनने 9 गुणांसह 2 पकडी करीत गुणांची कमाई करीत अष्टपैलू खेळ केला. तिला आदिती जाधव हिने चांगली साथ देत 1 गुणांसह 3 पकडी घेत 4 गुण मिळवित विजयात मोलाचा वाटा उचलला.
झुंजार खेड संघाने बचाबात्मक धोरण स्विकारल्याने त्यांनी मध्यंतरा पर्यंत संथ खेळ केला. मध्यंतरानंतर मात्र रितिका होनमाणे हिने आक्रमण करीत चांगला खेल केला. तिने 10 गुणांसह 1 बोनस गुण मिळविला.
यात तिने एक सुपर चढाई करीत 4 गुण मिळविले. तिला सत्यवा हळदकेरी हिने चांगली साथ देत 2 गुण व 3 पकडी घेत 5 गुण मिळवित चांगली लढत दिली.
महिलांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वेगवान पुणे या संघाने माय मुळशी संघावर 21-17 असा विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला वेगवान पुणे संघाकडे 12-11 गुणांची आघाडी होती. वेगवान पुणे संघाच्या श्रध्दा चव्हाण हिने 5 गुण व 2 बोनस असे 7, दिक्षा जोरी हिने 4 गुणांसह 3 पकडी घेत अष्टपैलू खेळ करीत 7गुण मिळविले.
त्यांना धनश्री सणस हिने उत्कृष्ट पकडी घेत 3 गुण मिळविले. माय मुळशी संघाच्या तेजल पाटील हिने 6 गुण, प्रणाली आंबेकर हिने 1 गुण व 2 पकडी घेत 3 गुण घेतले. त्यांना साक्षी गावडे हिने 1 गुण व 2 पकडी घेत चांगली साथ दिली.
सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना दोन्ही संघ 17-17 असे बरोबरीत होते. त्यानंतर वेगवान पुणे संघाच्या दिक्षा जोरी हिने पकड घेत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पुरूषांच्या अत्यंत चुरशीच्या खेळलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिवनेरी जुन्नर संघाने माय मुळशी संघावर 37-31 असा विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला शिवनेरी जुन्नर संघ 13-18 असा 5 गुणांनी पिछाडीवर होता. शिवनेरी संघाच्या अक्षय जाधव व मयुर तांबोळी आणि अभिमन्यू गावडे यांच्या वेगवान खेळामुळे मध्यंतरानंतर सामन खेचला.
शिवनेरीच्या अक्षय जाधव याने 10 गुणांसह 3 बोनस गुण मिळवित 13 गुणांची वसूली केली. मध्यंतरानंतर अक्षय जाधवने वेगवान चौफेर चढाया करीत मैदान दणामून सोडले व आपल्या संघाला मध्यंतरानंतर लोन लावत 21-20 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर त्याला अभिमन्यू गावडे याने 6 गुण, व प्रथमेशने केलेल्या 5 उत्कृष्ट पकडी आणि मयुर तांबोळी याने केलेला उत्कृष्ट खेळाच्या जोरावर आपली आघाडी वाढवित नेली.
सामना संपण्यास केवळ चार मिनिटे बाकी असताना शिवनेरीने दुसरा लोन लावत आपल्या संघाला 33-25 अशी आघाडी मिळवून दिली.
माय मुळशी संघाच्या बबलू गिरीने जोरदार खेळ करीत आपल्या संघाला मध्यंतराला आघाडी मिळवून दिली होती. मात्र मध्यंतरानंतर मात्र त्यांना आपली आघाडी टिकविता आली नाही त्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला. बबलू गिरी याने 10 गुणांसह 1 पकड घेतली. ऋषिकेष बनकर याने अष्टपैलू खेळ करीत 3 पकडींसह 6 गुण व 1 बोनस गुण मिळविले. त्यांना योगेश लुगाडे याने 5 गुण मिळवित जोरदार संघर्ष केला. मात्र त्यांचा हा संघर्ष अपुरा ठरला.
पुरूषांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वेगवान पुणे संघाने बलाढ्य बारामती संघावर 32-24 विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात वेगवान पुणे संघाच्या सतिश पाटील, विवेक घुले, चेतन पारधे व गणेश कांबळे यांच्या जोरदार खेळाच्या जोरावर हा विजय साजरा केला.
मध्यंतराला वेगवान पुणे संघाकडे 15-12 अशी निसटती आघाडी होती. वेगवान पुणे संघाच्या गणेश कांबळे याने 6 गुण व 1 बोनस सह 7 सात गुण मिळविले, त्याला चेतन पारधे याने घेतलेल्या उत्कृष्ट पकडीमध्ये मिळविलेले 5 गुण, विवेक घुले याने मिळविलेले 4 गुण व 1 बोनस आणि सतिश पाटील याने मोक्याच्या वेळी दोन सुरर टॅकलसह मिळविलेले 5 गुण यांच्या जोरावर हा सामना जिंकला.
बलाढ्या बारामती संघाला अति आत्मविश्वास नडल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. बलाढ्या बारामती संघाच्या सोमनाथ लोखंडे याने 7 गुण, 1बोनस व 1 पकड घेत 9 गुण मिळविले. निलेश काळेबेरे याने 6 गुण मिळविले. तर आदम शेख याने उत्कृष्ट पकडी घेत 5 गुण मिळवित चांगला प्रतिकार केला. मात्र त्यांना विजया पासून वंचित राहवे लागले.