भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) नवा अध्यक्ष बनणार आहे. त्याला या अध्यक्षपदावर अधिकृतरित्या 23 ऑक्टोबरला नियुक्त केले जाईल. त्यामुळे सध्या गांगुलीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
गांगुलीला अध्यक्ष बनवण्याच्या निर्णयाचे पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरनेही कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की गांगुलीने भारतीय क्रिकेटमध्ये बदल घडवला आहे. तसेच त्याच्याकडे क्रिकेटचे चांगले ज्ञान असून त्याने भारतीय क्रिकेटची मानसिकता बदलली.
2008 च्या पहिल्या आयपीएल मोसमात कोलकता नाईट रायडर्सकडून गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळलेला अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला, ‘सौरव गांगुली असा एक व्यक्ती आहे ज्याने भारतीय क्रिकेटमध्ये बदल घडवला. 1997-98 च्या आधी वाटले नव्हते की पाकिस्तानला भारत पराभूत करु शकेल.’
‘गांगुली कर्णधार बनण्याआधी मला असे वाटत नव्हते की भारताकडे पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी व्यवस्था आहे. गांगुलीने भारतीय क्रिकेटची मानसिकता बदलली. त्याच्याकडे भारताकडून खेळण्यासाठी प्रतिभावान खेळाडू शोधण्याचा दृष्टीकोन आहे.’
‘सौरव गांगुलीकडे चांगले नेतृत्वगुण आहे. तो प्रतिभावान व्यक्तीची प्रामाणिकपणे निवड करतो. त्याच्याकडे क्रिकेटचे चांगले ज्ञान आहे.’