महाराष्ट्र राज्याच्या सत्तेमध्ये मागील काही दिवसांपासून अनेक उलथापालथ दिसली आहे. यामध्ये नवीन आलेल्या सरकारने अनेक मोठी निर्णय घेतली आहेत. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्याचा पहिला धक्का बसला असून दुसरा मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना बसला आहे.
दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत भारतीय कुस्ती संघटनेने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पवार हे या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असून भारतीय कुस्ती संघटनेने अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण आहेत. हा निर्णय पवारांसाठी धक्कादायकच ठरला आहे.
देशात महाराष्ट्रातील कुस्तीचे महत्व मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्राच्या अनेक कुस्तीपटूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धां गाजवल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसात भारतीय कुस्ती संघटनेच्या काही प्रस्तावांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. इतकेच नाही तर राज्यातील कुस्तीपटूंनी राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत तक्रारी केल्या होत्या.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने १५ वर्षाखालील आणि २३ वर्षाखालील गटांसाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, हे या बरखास्तीमागचे मोठे कारण ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या स्पर्धा महाराष्ट्रासाठी महत्वाच्या असून त्याचेच आयोजन न झाल्याने राज्यातील कुस्तीपटूंनी निराशा व्यक्त केली होती. दरम्यान. भारतीय कुस्ती संघटनेच्या निर्देशांचे पालन होत नसल्यामुळे याआधीही राज्य कुस्ती परिषद रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता. पण परिषदेकडून कोणतीही अपेक्षित हालचाल न झाल्यामुळे शेवटी परिषदच बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परिषद बरखास्त करण्याचा निर्णय कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर घेण्यात आल्याचे कळते. त्याचबरोबर जिल्हा संघटनांच्या तक्रारी आणि स्पर्धाचं आयोजन न केल्याचा परिणामही झाल्याचा दिसत आहे. काही माजी कुस्तीपटूंकडून गेल्या अनेक वर्षात तक्रारी केल्या जात आहेत. या वर्षी देखील परिषदेविरोधात तक्रारी दिल्या गेल्या होत्या अशी माहिती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी दिली.
“आम्ही काही दिवसांपूर्वी १५ वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले होते. त्याला परिषदेने वेळेवर नकार दिला. त्याचबरोबर २३ वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धाबाबत कोणताच निर्णय घेतला नाही,” असे तोमर यांनी म्हटले आहे.
ठाकरे यांच्या आरेतील मेट्रोकारशेडच्या निर्णयानंतर हा सर्वात मोठा निर्णय ठरला आहे. तसेच बृजभूषण यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शवला होता. यामुळेच आता पुढे कोणाच्या कशा प्रतिक्रिया येतात आणि यावरून राज्यातील वातावरण अजून खराब होण्याची चिन्हे दिसत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतने शतक करताच द्रविडचा दिसला कधीच न पाहिलेला अवतार, Video व्हायरल
वनडे आणि टी२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; बटलरकडे नेतृत्त्वपद, तर ‘हा’ घातक फिरकीपटू बाहेर
दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाखाली भारताचा सोपा विजय, डर्बीशायरला ७ विकेट्सने केले पराभूत