टॉम ब्रूस आता न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी माजी खेळाडू ठरला आहे. पण त्याने निवृत्ती जाहीर केलेली नाही, तर थेट आपली क्रिकेट टीमच बदलली आहे. टॉम ब्रूस (Tom Bruce) आता न्यूझीलंडऐवजी स्कॉटलंडसाठी खेळताना दिसेल. क्रिकेट स्कॉटलंडने त्याचा समावेश कॅनडामध्ये होणाऱ्या ICC पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 मालिकेच्या संघात केला आहे. स्कॉटलंड क्रिकेट बोर्ड टॉम ब्रूसच्या संघात सामील होण्याने खूप आनंदी आहे.
टॉम ब्रूसने 2017 तो 2020 या काळात न्यूझीलंडकडून 17 टी-20 सामने खेळले असून त्यात त्याने 279 धावा केल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तो त्रिशतक झळकावणारा खेळाडू आहे. न्यूझीलंडसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 93 सामन्यांत त्याने 6,267 धावा केल्या आहेत, त्यात त्याचा सर्वोच्च स्कोअर 345 धावा आहे. न्यूझीलंडच्या संघात निवड होण्याआधी टॉम ब्रूस स्कॉटलंड डेव्हलपमेंट टीमसाठीही खेळला आहे.
स्कॉटलंडच्या क्रिकेट संघात सामील झाल्यानंतर टॉम ब्रूस म्हणाला, माझ्या कुटुंबाचा स्कॉटिश संघाशी दीर्घकाळापासून संबंध आहे. मला खात्री आहे की मी या देशासाठी वर्ल्ड स्टेजवर खेळत असल्याचे कळल्यावर माझ्या कुटुंबाला खूप आनंद होईल. मला पाच वर्षे न्यूझीलंडसाठी खेळण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान मानतो. मी अजूनही वर्ल्ड स्टेजवर खेळू इच्छितो आणि स्कॉटलंडसाठी यश मिळवू इच्छितो.
तो पुढे म्हणाला, 2016 मध्ये मी काही काळासाठी या संघासोबत जोडला गेलो होतो, तो अनुभव खूप छान होता. मी स्कॉटलंडच्या संघातील खेळाडूं सोबतही खेळलो आहे आणि त्यांच्याविरुद्धही खेळलो आहे. त्यांच्या यशस्वी प्रवासाला मी जवळून पाहिले आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्यासोबत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे.





