पॅरिस ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी (31 जुलै) भारतासाठी एक चांगली बातमी आहे. स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळे यानं पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या पात्रता फेरीत सातव्या स्थानी राहून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्वप्नीलनं पात्रता फेरीत 590 गुण मिळवून सातवं स्थान पटकावलं. पात्रता फेरीतील अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीत पोहोचले. स्वप्नील आता उद्या (1 ऑगस्ट) पदकासाठी खेळणार आहे. हा सामना गुरुवारी दुपारी 1 वाजता होईल.
या स्पर्धेत नेमबाजांना तीन पोझिशनमध्ये (बसून, झोपून आणि आणि उभं राहून) निशाणा लावावा लागतो. याच स्पर्धेत आणखी एक भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग 11व्या स्थानावर राहिला. त्याचा स्कोर 589 होता. स्वप्नील हा मूळचा कोल्हापूरचा आहे. आता त्याच्याकडून देशाला नेमबाजीत आणखी एका पदकाची अपेक्षा असेल.
पात्रता फेरीत चीनचा लियू युकुन 594 गुणांसह अव्वल स्थानावर राहिला, जो ऑलिम्पिक पात्रतेचा विक्रम आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत दोन पदके जिंकली आहेत. मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकलं. तसेत तिनं सरबज्योत सिंगसोबत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेतही कांस्यपदक जिंकलं.