क्रीडाविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा अव्वल गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर याने खास पराक्रम गाजवला. तो सोमवारी (दि. 19 जून) भुवनेश्वर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी 21.77 मीटर लांब गोळा फेकत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी क्वालिफाय झाला. यासोबतच त्याने आपला आशियाई विक्रमही मोडीत काढला. चला तर सविस्तर जाणून घेऊयात…
तजिंदरपाल सिंग तूरचा खास विक्रम
पंजाबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 28 वर्षीय तजिंदरपाल सिंग तूर (Tajinderpal Singh Toor) याच्या नावावर 21.49 मीटर लांब गोळा फेकण्याच्या आशियाई विक्रमाची नोंद होती. हा विक्रम त्याने पटियालामध्ये 2021मध्ये केला होता. अशात तजिंदरपालने तिसऱ्या थ्रोमध्ये 21.77 मीटर लांब गोळा फेकला. ही चालू हंगामातील नववी सर्वोत्तम कामगिरी ठरली. विशेष म्हणजे, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठीचे मानक 21.40 आहे. यासोबतच तो आशियाई स्पर्धांसाठीही पात्र ठरला आहे, ज्याचे पात्रता मानक 19 मीटर इतके आहे.
तजिंदरपालची शानदार सुरुवात
सध्याचा आशिया स्पर्धांमधील सुवर्णपदक विजेता तजिंदरपाल सिंग तूर याने शानदार सुरुवात केली आहे. त्याने 21.09 मीटरच्या सुरुवातीच्या थ्रोसह थेट 20 मीटरचा निशाणा लावला. आशियाई विक्रम मोडण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याचा दुसरा थ्रो फाऊल ठरला होता. शेवटचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने दोन फाऊल केले होते.
तजिंदरपाल म्हणाला की, “माझे प्रशिक्षण योजनेनुसार झाले. मी 21 मीटरचा टप्पा पार करण्यासाठी तयार होतो. माझी पुढील योजना 22 मीटरचा टप्पा पार करण्याची आहे.”
दुसऱ्या स्थानी राहिला करणवीर सिंग
पंजाब राज्याचा करणवीर सिंग 19.78 मीटरच्या थ्रोसह दुसऱ्या स्थानी राहिला. त्याने आशियाई स्पर्धांसाठीही क्वालिफाय केले. तसेच, 100 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक विजेत्या ज्योती याराजी हिला सर्वोत्तम महिला ऍथलिट म्हणून घोषित केले गेले. (shot putter tajinder pal toor shatters own asian record and also qualifies for world championships)
महत्वाच्या बातम्या-
अखेर पाकिस्तान संघाला मिळाला भारताचा व्हिसा, ‘या’ दिवशी होणार IND vs PAK सामना; लगेच वाचा
जोडी जबरदस्त! एकाच सामन्यात अँडरसन अन् ब्रॉडने रचला इतिहास, अनिल कुंबळेचा विक्रमही उद्ध्वस्त