युएई येथे सुरू असलेला टी२० विश्वचषक अंतिम टप्प्यात आला आहे. साखळी फेरीच्या समाप्तीनंतर उपांत्य फेरीचे चारही संघ ठरले असून, १४ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाईल. त्याच वेळी जगातील सर्वात श्रीमंत व्यवसायिक क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामासाठी कायम करण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या नावांची देखील घोषणा होऊ शकते. विराट कोहली हा पुढील हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व करणार नसल्याने त्याच्या जागी दोन खेळाडूंना पहिली पसंती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
विराटने सोडले नेतृत्व
भारतीय टी२० संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर विराट कोहली याने आयपीएलमध्ये आपण यापुढे नेतृत्व करणार नसल्याचे म्हटले होते. २०१३ पासून तो आरसीबी संघाचा कर्णधार होता. या काळात तो एकदाही संघाला विजेता बनवू शकला नाही. त्यामुळे, आयपीएल २०२१ चा उत्तरार्ध सुरू होण्यापूर्वी त्याने आपण नेतृत्व सोडत असल्याची घोषणा केली होती.
लोकल बॉय राहुल बनू शकतो पुढील कर्णधार
मूळ बेंगलोरचा असलेला मात्र आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाचे नेतृत्व करणारा केएल राहुल हा आरसीबीचा पुढील कर्णधार होऊ शकतो. तो पंजाबचे नेतृत्व सोडून मेगा लिलावात उतरणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. असे झाल्यास आरसीबी त्याच्यासाठी भली मोठी बोली लावून त्याला आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न करेल. तो यापूर्वीदेखील संघाचा सदस्य राहिला होता.
अय्यरलाही मिळु शकते संधी
आयपीएल २०२० मध्ये आपल्या कल्पक नेतृत्त्वाखाली जोरावर दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाणारा श्रेयस अय्यर हा देखील आरसीबीचा कर्णधार बनण्याच्या शर्यतीत आहे. दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंतला कर्णधारपदी कायम केल्यानंतर, अय्यर दुखावला असेल तो कोणत्याही संघाचे नेतृत्व करण्यासाठी तयार आहे. अय्यर मेगा लिलावात सहभागी झाल्यास त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.