भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या श्रेयस अय्यरने पहिल्या डावात तुफानी शतक झळकावले आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले यासह त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी केएल राहुल दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे त्याच्या ऐवजी श्रेयस अय्यरला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. या संधीचा पुरेपूर लाभ घेत त्याने पहिल्या डावात १७१ चेंडूंमध्ये १०५ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात भारतीय संघ अडचणीत असताना त्याने १२५ चेंडूंमध्ये ६५ धावांची खेळी केली. यासह त्याने पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
पदार्पणाच्या सामन्यात शतक आणि अर्धशतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरच्या नावे अनेक मोठ्या विक्रमांची नोंद झाली आहे. त्यापैकीच एक म्हणजे त्याने पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. असा कारनामा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे.
या यादीत सर्वोच्च स्थानी भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आहे. शिखर धवनने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या पदार्पणाच्या सामन्यात १८७ धावा केल्या होत्या, तर रोहित शर्माने याच वर्षी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १७७ धावांची खेळी केली होती. आता श्रेयस अय्यरने न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १७० धावा केल्या आहेत.
पदार्पणाच्या सामन्यात १५० पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज
यासह श्रेयस अय्यर पदार्पणाच्या सामन्यात १५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये चौथा खेळाडू ठरला आहे. या यादीत लाला अमरनाथ, शिखर धवन, रोहित शर्मा यांचा समावेश आहे.
पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
१८७ धावा – शिखर धवन विरुद्ध ऑस्ट्रेलिया,(मोहाली , २०१३)
१७७ धावा – रोहित शर्मा विरुद्ध वेस्ट इंडिज, (कोलकाता, २०१३)
१७० धावा – श्रेयस अय्यर विरुद्ध न्यूझीलंड (कानपूर, २०२१)
१५६ धावा – लाला अमरनाथ विरुद्ध इंग्लंज, (मुंबई, १९३३)
महत्त्वाच्या बातम्या –
भारताला नडतोय जेमिसन! अश्विनला बाद करताच नावावर केला मोठा पराक्रम
वनडे, कसोटी असो वा टी२०, भारताच्या ‘या’ तीन क्रिकेटपटूंनी तिन्ही प्रकारात झळकावलीत शतके
दिल्ली बुल्सला चीअर करण्यासाठी ‘बेबी डॉल’ची सामन्याला हजेरी, पतीसोबत पोहोचली अबू धाबीत