खांद्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर मागील काही महिन्यांपासून क्रिकेट मैदानापासून दूर आहे. खांद्याच्या सर्जरीनंतर भारताच्या श्रीलंका दौऱ्यातून तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. मात्र दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने संघ व्यवस्थापनाने त्याला अजून काही काळ विश्रांती देण्याचे ठरवले. मात्र आता लवकरच तो मैदानात उतरणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) त्याला तंदुरुस्ती शिबीरासाठीच्या (फिटनेस कँप) ४५ सदस्यीय संघात सहभागी केले आहे.
सलिल अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील मुंबईच्या निवड समितीने भारतीय संघातील बऱ्याचशा सक्रिय शिलेदारांना या संघात निवडले आहे. अय्यरव्यतिरिक्त रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर यांचाही ४५ सदस्यीय संघात समावेश आहे. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर हा देखील या संघाचा भाग आहे.
याखेरीज अय्यरचा आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्स संघातील सहकारी अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ यांचीही तंदुरुस्ती शिबीरासाठी निवड करण्यात आली आहे. एमसीएने पत्रकार परिषदेत याबाबतीत बोलताना सांगितले की, ‘तंदुरुस्ती शिबीरासाठीच्या संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात एकूण ४५ सदस्यांचा समावेश आहे. योग्य वेळी तंदुरुस्ती शिबीराचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.’
अय्यरला मागील इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याला आपल्या खांद्याची सर्जरीही करावी लागली होती. दुखापतीमुळे तो आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात अनुपस्थित होता. त्याच्या गैरहजेरीत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या हाती संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. मात्र आता दुखापतीतून सावरलेला अय्यर उर्वरित आयपीएल हंगामात पुन्हा दिल्ली संघाचे नेतृत्त्व करताना दिसू शकतो.
गतवर्षी आयपीएल २०२० अय्यरच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. मात्र प्रतिस्पर्धी रोहित शर्मा कर्णधार असलेल्या मुंबई इंडियन्सच्या हातून पराभूत पत्कारत दिल्ली संघ उपविजेता ठरला होता.