भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका २५ नोव्हेंबरपासून सुरू हेणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जाईल. तत्पूर्वी, उभय संघात खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत भारताने ३-० अशा विजय मिळवला होता. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी२० मध्ये दोन भारतीय युवा खेळाडूंनी पदार्पण केले. तसेच कसोटी मालिकेतही युवा खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. कसोटी मालिकेत भारताच्या श्रेयस अय्यरला पहिल्यांदाच कसोटी संघात खेळण्याची संधी मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर अय्यर खूपच उत्साहीत दिसतोय. मालिका सुरू होण्यापूर्वी त्याने एक खास व्हिडिओ शेअर केला.
अय्यरने शेअर केलेल्या या व्हिडिओत त्याने रुग्णालायातून कसोटी मालिकेचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अय्यरसाठी २०२१ वर्ष काही खास राहिले नाही. वर्षाच्या सुरुवातील त्याला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात खेळताना क्षेत्ररक्षण करताना त्याला गंभीर दुखापत झाली होती. या सामन्यादरम्यान बेअरस्टोने एक मोठा फटका खेळला आणि अय्यरने हा चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला. चेंडू अडवण्याच्या नादात अय्यरने सूर मारला आणि यादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती.
दुखापत गंभीर असल्यामुळे अय्यरला इंग्लंडविरुद्ध पुढच्या सामन्यात सहभाग घेता आला नव्हता. दुखापतीनंतर त्याला बऱ्याच दिवसांसाठी क्रिकेटमधून विश्रांती घ्यावी लागली. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातही त्याला सहभाग घेता आला नव्हता. त्याच्या जागी रिषभ पंतने दिल्ली कॅपिट्स संघाचे नेतृत्व केले. मात्र, आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्याने संघात पुनरागमन केले.
https://www.instagram.com/reel/CWn6biDKqzZ/?utm_medium=copy_link
आता तो पुर्णपणे तंदुरुस्त झाला आहे आणि न्यूझीलंडविरुद्द खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी दिली गेली आहे. अय्यरने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळळेला नाही आणि तो त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी उत्साहात असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातील तो रुग्णालयात दिसत आहे, ज्यावेळी त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच क्षणात तो भारतीय संघाच्या कसोटी जर्सीमध्ये दिसत आहे. चाहत्यांना त्याचा हा व्हिडिओ खूपच आवडला आहे आणि ते या व्हिडिओवर व्यक्त होत आहेत.