कानपूर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना कानपूरमधील ग्रीनपार्क मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर कोणाला खेळवले जाणार, हा प्रश्न आहे.
केएल राहुलही मालिकेतून बाहेर
भारताचा फलंदाज केएल राहुल मांडीत आलेल्या स्नांयुच्या ताणामुळे या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता मयंक अगरवाल आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजीला उतरणार हे जवळपास पक्के आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यर या दोघांमध्ये स्पर्धा असेल.
सूर्यकुमार की श्रेयस?
खरंतर सूर्यकुमार आणि श्रेयस यांना यापूर्वीही कसोटी मालिकांसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे, पण त्यांना कधीही अंतिम ११ जणांमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत त्यांना जर खेळण्याची संधी मिळाली, तर त्यांच्यासाठी हे कसोटी क्रिकेटमधील पदार्पण ठरणार आहे.
तरी, सध्या या दोघांपैकी कोणाला कानपूर कसोटीत खेळवणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार यासाठी श्रेयसचे नाव पुढे आहे. सूर्यकुमारपूर्वी श्रेयसला अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
श्रेयसची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५४ सामन्यांमध्ये ५१.१८ च्या सरासरीने १२ शतके आणि २३ अर्धशतकांसह ४५९२ धावा केल्या आहेत. नाबाद २०२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. याशिवाय श्रेयसला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा देखील चांगला अनुभव आहे. त्याने २२ वनडे आणि ३२ टी२० सामने खेळले आहेत.
तसेच, सूर्यकुमारची प्रथम श्रेणीमधील आकडवारी पाहायची झाल्यास, त्याने ७७ सामन्यांत १४ शतके आणि २६ अर्धशतकांसह ४४.०१ च्या सरासरीने ५३२६ धावा केल्या आहेत. २०० धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
याव्यतिरिक्त जर संघव्यवस्थापनाने ७ फलंदाज आणि ४ गोलंदाज असे संघ संयोजन करण्याचा निर्णय घेतल्यास, सूर्यकुमार आणि श्रेयस या दोघांनाही अंतिम ११ जणांमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
त्यामुळे आता पहिल्या सामन्यात प्रभारी कर्णधार असलेला रहाणे अंतिम ११ जणांच्या संघात श्रेयस आणि सूर्यकुमार या दोघांपैकी कोणाला संधी देणार हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“तो फॉर्ममध्ये येईल आणि धावा देखील करेल”, सतत फ्लॉप ठरत असलेल्या रहाणेची पुजाराकडून पाठराखण
कानपूरचे मैदान गाजवण्यासाठी भारतीय संघाचा कसून सराव!! बीसीसीआयने शेअर केले फोटो
कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाज ठरले फ्लॉप, दक्षिण आफ्रिकेचे पहिल्या डावात वर्चस्व