श्रीलंकाची राजधानी कोलंबो येथे १३ मे १९७८ ला अशा गोलंदाजाचा जन्म झाला होता, ज्यांनी पुढे त्यांच्या गोलंदाजीने पूर्ण क्रिकेटविश्वाला हादरून टाकले. हे गोलंदाज म्हणजे नुवान झोयसा. आज नुवान यांचा ४४वा वाढदिवस आहे.
नुवान यांनी त्यांच्या १० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत खूप काही मिळवले आहे. त्यांनी श्रीलंकाकडून ३० कसोटी सामने खेळत ६४ विकेट्स घेतल्या होत्या. तर, वनडेत ९५ सामने खेळत १०८ विकेट्स घेतल्या होत्या. शिवाय त्यांची देशांतर्गत कारकिर्दही उल्लेखनीय होती. त्यांनी प्रथम श्रेणी, अ दर्जाचे सामने आणि टी२० लीग क्रिकेटमध्ये मिळून एकूण ५६४ विकेट्स घेतल्या होत्या.
७ मार्च १९९७ रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या नुवान यांनी, त्यांच्या वेगवान गोलंदाजीने पहिल्या ७ कसोटी सामन्यातच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
कसोटी पदार्पणाच्या वर्षातच नोव्हेंबरमध्ये श्रीलंका संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. यावेळी दोन्ही संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेतील हरारेमधील दुसऱ्या सामन्यात नुवान यांनी पहिले षटक गोलंदाजी करताना सलग ३ फलंदाजांना बाद केले होते. झिम्बाब्वेचे फलंदाज ट्रेवर ग्रिपर, मर्रे गुडविन आणि नील जॉनसन यांच्या नुवान यांनी सलग विकेट्स घेतल्या होत्या. यासह कसोटीत पहिल्या षटकात हॅटट्रिक करणारे ते जगातील आणि श्रीलंका संघातील पहिले गोलंदाज ठरले.
आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे नुवान यांची कारकिर्द दुखापतींनी भरलेली होती. त्यांना पायापासून ते कमरेपर्यंत सगळीकडे जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्यांची कसोटी कारकिर्द २००४मध्ये आणि वनडे कारकिर्द २००७मध्ये संपुष्टात आली.
नुवान यांनी आयपीएलमध्ये २००८साली डेक्कन चार्जर्स संघाकडून फक्त ३ सामने खेळले. यावेळी ते केवळ २ विकेट्स घेऊ शकले आणि तिथेच त्यांची आयपीएल कारकिर्द संपली. अखेर क्रिकेटमधून निवृत्ती घतल्यानंतर १ ऑक्टोबर २०१५ला नुवान हे श्रीलंका संघाचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक बनले (Sri Lanka former fast bowler Nuwan Zoysa Birthday Special).
मात्र, २०१८मध्ये त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप लावण्यात आला. त्यांनी इग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपुर्वी खेळाडूंना मॅच फिक्सिंग करण्यासाठी प्रवृत्त केले आणि त्यांना खराब खेळण्यास मजबूर केले, असा आरोप त्यांच्यावरती लावण्यात आला होता. यामुळे नुवान यांना त्यांच्या प्रशिक्षकपदावरून निलंबीत करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सचा ‘धोनीसेने’विरुद्ध २० वा विजय! पाहा सीएसकेला सर्वाधिकवेळा कोणी केलय पराभूत
‘पुढच्या हंगामात सर्व ठीक होईल, चढ-उतार येत असतात’, मुंबई इंडियन्सच्या सलामीवीराचा विश्वास
एकदा- दोनदा नाही, तर चेन्नईने तिसऱ्यांदा मुंबईविरुद्ध केलीय निराशाजनक कामगिरी; वाचा सविस्तर