आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बंदी घालण्यात आलेला भारतीय वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा चर्चेत आला आहे. त्याने आपल्या एका विधानाने खळबळ उडवून दिली आहे. २०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंत दोषी आढळला होता. याचप्रकरणी त्याने वक्तव्य केले आहे.
एका वाहिनीशी बोलताना श्रीसंत म्हणाला, “एका षटकात १४ पेक्षा जास्त धावांची गरज होती. मी ४ चेंडूत फक्त ५ धावा खर्च केल्या होत्या. त्यात एकही नो बॉल, वाइड बॉल आणि स्लो बॉलसुद्धा नव्हता. माझ्या पायावर १२ शस्त्रक्रिया झाल्यानंतरही मी १३० पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत होतो. दुखापतीनंतर मी भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होतो. मग मी ‘स्पॉट फिक्सिंगसारख्या’ गोष्टी का करू?”
“मी इराणी करंडक स्पर्धेत भाग घेतला होता आणि सप्टेंबर २०१३ मध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी मी स्वतःला तयार करत होतो. त्या मालिकेचा एक भाग बनणे हे माझे ध्येय होते. त्यामुळे असा व्यक्ती, ज्याचे काही ध्येय आहे तो कधीच असे काही करणारच नाही आणि तेही १० लाख रुपयांसाठी. मी मोठ्या बाता करत नाहीये, पण जेव्हा मी पार्टी करायचो, तेव्हा माझी बिलेही सुमारे २ लाख रुपये यायची,” असेही त्याने सांगितले.
वर्ष २०१३ मध्ये जेव्हा राजस्थान रॉयल्सच्या काही खेळाडूंची नावे फिक्सिंगमध्ये आली, तेव्हा क्रिकेट जगतात खळबळ उडाली होती. यादरम्यान ज्या खेळाडूचे नाव सर्वात जास्त चर्चेत आले ते भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याचे. श्रीसंतने आपली शिक्षा पूर्ण केली असून त्याने केरळसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्येही भाग घेतला आहे. पुढे बोलताना श्रीसंत म्हणाला की, “मी अनेक लोकांना मदत केली आहे आणि त्यांच्या प्रार्थनांमुळे मी तिथून बाहेर पडू शकलो.”
श्रीसंतने २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध नागपुरात एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. २००७ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या मिसबाह-उल-हकचा झेल घेतल्यानंतर त्याची लोकप्रियता वाढली होती. नंतर तो २०११ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होता. २०१३ मध्ये आरोप झाल्यानंतर अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या २ खेळाडूंना श्रीसंतसह अटक करण्यात आली होती. आरोपातून मुक्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवली.
श्रीसंत म्हणाला की, “स्पॉट फिक्सिंगच्या घटनेनंतर मी मानसिक तणावात गेलो होतो. एखाद्याला दोष देणे खूप सोपे असते, परंतु त्या घटनेमुळे मी, माझे कुटुंब, माझे मित्र आणि माझे प्रियजन सर्वांनी कठीण प्रसंगांना तोंड दिले. त्या अनुभवाबद्दल मी एवढेच सांगू शकतो की तो एक प्रकारचा मृत्यूच होता.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘सगळी हॉटनेस एकाच संघात भरलीय’, कोहलीच्या शर्टलेस फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ; तुम्हीही पाहा
सौरव गांगुलीला कोलकाता उच्च न्यायालयाचा दणका; जमीन वाटप प्रकरणात सुनावला आर्थिक दंड
‘मला त्याची पाकिस्तानातच बेईज्जती करायची होती’, कैफने सांगितलं कशी केली अख्तरची फजिती?