भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये लवकरच २ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी २५ नोव्हेंबर पासून कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत. अशातच या सामन्यात एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली हा पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे. त्याच्या ऐवजी संघाच्या कर्णधाराची भूमिका अजिंक्य रहाणे पार पाडणार आहे, तर या सामन्यात आणखी एक मोठा बदल म्हणजे, आतापर्यंत कसोटी संघासाठी डावाची सुरुवात करणारा युवा फलंदाज शुबमन गिल पहिल्या कसोटी सामन्यात मध्यक्रमात फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शुबमन गिलला सलामीवीर फलंदाज म्हणून संधी देणारे निवडकर्ते जतिन परांजपे यांनी देखील या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मला वाटते की, शुबमन गिलने मधल्या फळीत फलंदाजी करणे भारतीय संघासाठी नेहमी फायदेशीर ठरेल.हे नेहमी संघाला एक अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून देईल.”
तसेच तुफान फॉर्ममध्ये असलेला केएल राहुल आणि मयांक अगरवाल पहिल्या कसोटी सामन्यात डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समिती आणि सध्याच्या संघ व्यवस्थापनाला असे वाटते की, विराट कोहली शिवाय असा आणखी एक फलंदाज हवा जो मध्यक्रमात फलंदाजीला येईल आणि विरोधी संघाला अडचणीत टाकेल.
न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.(विराट कोहलीला पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.)
महत्त्वाच्या बातम्या –
“बेबी क्या कर रहे हो?” शिखर धवनचा मजेशीर व्हिडिओ पाहून हसून हसून व्हाल लोट पोट
काय सांगता!! कुत्रा करतोय यष्टीरक्षण आणि क्षेत्ररक्षण, खुद्द मास्टर-ब्लास्टरने शेअर केलाय व्हिडिओ
अजिंक्य रहाणे नशिबामुळे टिकून आहे भारतीय संघात? वाचा काय म्हणाले गंभीर आणि इरफान