भारतीय संघाला बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये खेळायचा आहे. हा सामना 22 नोव्हेंबरपासून खेळला जाईल. मात्र याआधी भारतीय खेळाडूंच्या दुखापतींची मालिका सुरू झाली आहे. यापूर्वी सराव सामन्यादरम्यान केएल राहुलला दुखापत झाल्याची बातमी आली होती. आता या यादीत शुबमन गिलचं नाव जोडल्या गेलंय.
वृत्तानुसार, सराव सामन्यादरम्यान शुबमन गिल जखमी झाला. स्लिपमध्ये कॅच घेत असताना गिलच्या बोटांना दुखापत झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. तो या सामन्यातून बाहेर पडू शकतो. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल. गिलच्या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या अनेक भारतीय खेळाडूंना दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. एका दिवसापूर्वीच स्टार फलंदाज केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्याची बातमी आली होती. त्याला दुखापतीमुळे निवृत्त होऊन मैदान सोडावं लागलं होतं. याशिवाय सरफराज खानलाही दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचं स्कॅन करण्यात आल्याची बातमी ऑस्ट्रेलियन मीडियानं दिली होती. अशा परिस्थितीत आता गिलची दुखापत हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे.
कर्णधार रोहित शर्मा आधीच मुलाच्या जन्मामुळे पर्थ कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. तो पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता फार कमी आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत आघाडीच्या फळीत शुबमन गिलवर मोठी जबाबदारी होती. मात्र आता तोही दुखापतीमुळे बाहेर पडल्यानं भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत आता सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनला भारतीय संघाकडून पदार्पणाची संधी मिळू शकते.
हेही वाचा –
“पुढचा धोनी कोण हे आधीच सांगितलं होतं..”, संजूच्या शतकानंतर शशी थरूर यांची 15 वर्ष जुनी पोस्ट व्हायरल
ऋतुराज गायकवाडनं भारतीय गोलंदाजांनाच धुतलं! पहिल्या कसोटीपूर्वी फलंदाजीनं खळबळ
IND VS SA; 3 खेळाडू ज्यांना मालिकेतील एकही सामन्यात संधी मिळाली नाही