भारतीय संघाचा स्टार युवा फलंदाज शुबमन गिल हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच पार पडलेल्या आशिया चषक 2023 स्पर्धेत त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. आता शुबमनचे लक्ष संघाला आगामी वनडे विश्वचषक जिंकून देण्यावर आहे. त्याने वनडे विश्वचषकाच्या ट्रॉफीविषयी मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितले आहे की, ‘जेव्हा भारताने विश्वचषक 2011मध्ये विजय मिळवला होता, तेव्हा मी विचार केला होता की, मलाही आयुष्यात एकदा ही ट्रॉफी उंचवायची आहे.’
खरं तर, शुबमन गिल (Shubman Gill) याचे वय त्यावेळी फक्त 12 वर्षे होते. भारतीय संघाचा दिग्गज कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक 2011 (ODI World Cup 2023) स्पर्धेची ट्रॉफी जिंकून दिली होती. अलीकडेच शुबमनने मुलाखतीदरम्यान विश्वचषकाशी संबंधित आपल्या आठवणी सांगितल्या.
स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत शुबमन म्हणाला, “जेव्हा भारताने 2011चा विश्वचषक जिंकला होता, तेव्हा मी फक्त 10-12 वर्षांचा होतो. हे अवास्तविक परिदृश्य होते. ही तीच वेळ होती, जेव्हा मला वाटले की, मला माझ्या आयुष्यात कमीत कमी एकदा तरी ती ट्रॉफी उंचवायची आहे. विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणे कोणत्याही मुलासाठी नेहमी एका स्वप्नाप्रमाणे असते आणि मोठा होत असताना माझेही हेच स्वप्न होते.”
‘विश्वचषकात संघासाठी शानदार कामगिरी करण्यावर माझे लक्ष्य’
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत शुबमन गिल याची भूमिका खूपच महत्त्वाची असेल. गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने अलीकडेच पार पडलेल्या आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत सर्वाधिक 302 धावा केल्या होत्या. त्याने नेहमीच स्वत:च्या क्षमतेपेक्षा पुढे जाऊन जबरदस्त प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, त्याला संघासाठी सर्वकाही द्यायचे आहे. याबाबत तो म्हणाला, “आतापर्यंतचा प्रवास कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नाहीये. जसजसे तुम्ही चांगले प्रदर्शन करता, तुमच्या स्वत:कडून अपेक्षा वाढतात. स्पर्धेच्या कोणत्याही टप्प्यात जिथेही मला संधी मिळेल, तिथे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्न करत राहायचे आहे.”
अवघ्या 24 वर्षांचा असलेला गिल हा पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार आहे. त्याची विश्वचषकासाठी भारताच्या 15 सदस्यीय संघात निवड झाली आहे. क्रिकेटच्या या महाकुंभमेळ्यात तो भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत डावाची सुरुवात करताना दिसेल. मागील काही काळापासून गिल या खेळीवर धावांचा पाऊस पाडत आला आहे. तसेच, संघाला पुढेही त्याच्याकडून अशाच भन्नाट प्रदर्शनाची अपेक्षा असेल. (shubman gill lift world cup trophy said this read here)
हेही वाचाच-
IND vs AUS : संभावित Playing XI ते खेळपट्टी आणि हवामान, पहिल्या वनडेची खडानखडा माहिती एकाच क्लिकवर
आयसीसी वर्ल्डकप ट्रॉफी सर्वसामान्यांना पाहता येणार, पुण्यात भव्य मिरवणूक