भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल सध्या इंग्लंडमध्ये आहे. नुकताच त्याने ग्लॅमॉर्गन काऊंटी क्रिकेट क्लब सोबत करार केला होता. मंगळवारी (6 सप्टेंबर) त्याने आपल्या काऊंटी संघासाठी पदार्पण केले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. वॉर्सेस्टरशायरविरुद्धच्या या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने शानदार अर्धशतकी खेळी करत आपले पदार्पण साजरे केले.
भारतीय संघासह वेस्ट इंडिज व झिम्बाब्वे दौऱ्यावर शानदार कामगिरी केल्यानंतर गिल दोन्ही मालिकेत मालिकावीर ठरलेला. त्यानंतर त्याला भारत अ संघाचे कर्णधारपद देण्याची चर्चा सुरू झालेली. मात्र, त्याने इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याला प्राधान्य दिले. त्यानंतर त्याने वॉर्सेस्टरशायरविरुद्ध आपला पहिला सामना खेळला. त्याच्यासह न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल याने देखील काउंटी डेब्यू केला.
सामन्याच्या पहिल्या दिवशी वॉर्सेस्टरशायरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी गॅरेथ रोडरिकच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 454 धावा काढल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्लॅमॉर्गनने पदार्पण करणाऱ्या गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर 8 बाद 241 धावा केल्या. गिलने 148 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 92 धावा केल्या. दुर्दैवाने तो शतकापासून वंचित राहिला. दुसऱ्या डावात संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल.