बांगलादेशविरुद्ध चेन्नईचा एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय टॉप ऑर्डरनं पुन्हा एकदा निराशा केली. सलामीवीर रोहित शर्मा संघाला चांगली सुरुवात देऊ शकला नाही. यानंतर शुबमन गिल आणि अनुभवी विराट कोहली देखील खराब फटके खेळून पॅव्हेलियनमध्ये परतले. शुबमन गिल या सामन्यात भोपळा न फोडताच बाद झाला. यासह त्यानं एका नकोशा लिस्टमध्ये आपली जागा निर्माण केली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात गिल अजिबात लयीत दिसला नाही. तो 8 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. बांगलादेशचे गोलंदाज गिलविरुद्ध एका रणनीतीनुसार गोलंदाजी करत होते आणि त्याला लेग साईडला मारायला भाग पाडत होते. शेवटी याचा फायदा त्यांना मिळाला. हसन महमूदनं गिलला 8व्या षटकाचा तिसरा चेंडू लेग साईडवर टाकला आणि त्याला शॉट खेळण्यास भाग पाडलं. चेंडू गिलच्या बॅटची कड चाटून गेला आणि यष्टीरक्षक लिटन दासनं झेल घेतला.
शुबमन गिल यावर्षी घरच्या मैदानावर तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. यासह गिल एका कॅलेंडर वर्षात 3 किंवा त्याहून अधिक वेळा शून्यावर बाद होणारा सहावा भारतीय फलंदाज ठरला. मोहिंदर अमरनाथ हा एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय फलंदाज आहे. 1983 मध्ये ते 5 वेळा खातं न उघडता बाद झालं होता. या यादीत कोहलीच्या नावाचाही समावेश आहे. 2021 मध्ये कोहली तीन वेळा शून्यावर बाद झाला होता.
2024 मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे भारतीय
जसप्रीत बुमराह – 4
शुबमन गिल – 3
संजू सॅमसन – 3
विराट कोहली – 3
रजत पाटीदार – 2
शिवम दुबे – 2
मुकेश कुमार – 2
मोहम्मद सिराज – 2
रवींद्र जडेजा – 2
रोहित शर्मा – 2
या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात सर्वांचं लक्ष वेगवान गोलंदाज नाहिद राणाकडे होतं, परंतु महमूद आऊट ऑफ सिलॅबस आला. त्यानं पहिल्याच सत्रात रोहित शर्मा (6), शुबमन गिल (0) आणि विराट कोहली (6) यांची विकेट घेतली.
हेही वाचा –
18 वर्षाच्या खेळाडूची कमाल, पाकिस्तानी क्रिकेटपटूचा 24 वर्ष जुना विक्रम मोडला!
चेन्नई कसोटीच्या पहिल्याच दिवशी वाद, रिषभ पंत लिटन दासशी भिडला; जाणून घ्या प्रकरण
चेन्नई कसोटीच्या पहिल्याच सत्रात भारताचं कंबरडं मोडणारा हसन मेहमूद कोण आहे?