मुंबई । ज्युनिअर युवराज सिंग या नावाने ओळखला जाणारा पंजाबचा युवा क्रिकेटपटू शुभम गिल स्थानिक सामन्यात खोऱ्याने धावा काढत आहे. त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीने साऱ्यांनाच प्रभावित केले आहे. ज्युनियर क्रिकेट मधला हिरो शुभम गिल हा भारताकडून दीर्घकाळ खेळू शकतो, अशी भविष्यवाणी क्रिकेट जाणकारांनी यापूर्वीच केली आहे.
आयपीएलमध्ये केकेआरच्या संघाकडून खेळणारा शुभम गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक विक्रम मोडण्याचे स्वप्न पाहिले आहे. भारतीय संघाकडून अवघे २ वनडे सामने खेळणाऱ्या या २० वर्षीय खेळाडू म्हणाला, “भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचे स्वप्न मी पाहतोय. यासोबतच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचे माझे स्वप्न आहे.”
सध्या हे दोन्ही विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे सचिनने आपल्या कारकिर्दीत 200 कसोटी सामन्यात 15 हजार 921 धावा केल्या आहेत. शुभमन गिल भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला आदर्श मानतो. 2014-15 या सलग दोन वर्षात बीसीसीआय कडून ‘बेस्ट ज्युनिअर क्रिकेटर’चा सन्मान मिळवला आहे. गिलने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
आतापर्यंत त्याला दोनच आंतरराष्ट्रीय सामने खेळता आले पण या दोन्ही सामन्यात त्याला छाप सोडता आली नाही. बीसीसीआयने याच वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या न्यूझीलंड दौऱयात भारत- अ संघाच्या कर्णधारपदाची धुरा शुभमन गिलवर सोपवली होती. येथे झालेल्या प्रथम श्रेणीच्या 2 सामन्यात 83, 204 नाबाद आणि 136 धावांची खेळी केली होती.
मोठे फटके मारण्यात माहीर असलेला गेलने आयपीएलच्या 27 सामन्यात त्याने 499 धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे . तसेच 76 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.