महाराष्ट्र प्रिमियर लीग 2025 (MPL 2025) च्या 17 व्या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्सवर थरारक विजय मिळवला. अगदी अटीतटीच्या झालेल्या सामन्यात कोल्हापूरला थोडक्यात पराभूत व्हावे लागले. मात्र, असे असतानाही या सामन्यात कोल्हापूरचा खेळाडू सिद्धार्थ म्हात्रे याने घेतलेल्या एका झेलाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी हा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल असल्याचे म्हटले.
पुणेरी बाप्पा संघाला या सामन्यात विजयासाठी 187 धावांचा पाठलाग करायचा होता. पुणेरी बाप्पा संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करत शेवटच्या षटकात नेला. अखेरच्या षटकात त्यांना विजयासाठी 9 धावांची आवश्यकता होती. रामकृष्ण घोष व अद्वय शिदये यांनी पहिल्या दोन चेंडूवर तीन धावा काढल्या. त्यानंतर पुणे संघाला शेवटच्या चार चेंडूंमध्ये सहा धावा हव्या होत्या. आधीच्या चेंडूवर अर्धशतक पूर्ण केलेल्या रामकृष्ण घोष याने सरळ षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, लॉंग ऑनवरून वाघासारखी झेप घेत सिद्धार्थ म्हात्रे याने झेल पूर्ण केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच आयपीएलमध्ये अशा प्रकारचे झेल पाहायला मिळतात. अगदी त्याच दर्जाचा हा झेल होता. असे असले तरी कोल्हापूर टस्कर्स आणि सिद्धार्थ यांचा आनंद फार काळ टिकला नाही. सुरज शिंदे याने पुढच्याच चेंडूवर षटकार मारत आपल्या संघाला विजयी केले.
या सामन्याचा विचार केल्यास पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने सचिन धस याच्या 60, कर्णधार राहुल त्रिपाठी याच्या 47 व अंकित बावणे आणि सिद्धार्थ म्हात्रे यांच्या उपयुक्त योगदानामुळे 186 अशी मोठी धावसंख्या उभी केली होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पुणेरी बाप्पाची सुरुवात अडखळत झालेली. मात्र, अद्वय शिदये आणि रामकृष्ण घोष यांनी 52 चेंडूंमध्ये 101 धावांची शानदार भागीदारी करत पुणे संघाला विजयाच्या दिशेने गेले. विजयासाठी तीन चेंडूंमध्ये सहा धावांची गरज असताना सुरज शिंदे याने उत्तुंग षटकार ठोकत आपल्या संघाला विजयी केले. अद्वय शिदये सामनावीर ठरला.
यापूर्वी स्पर्धेत काही अप्रतिम झेल पाहायला मिळाले आहे. यामध्ये रत्नागिरी जेट्सचा यष्टीरक्षक अभिषेक पवार व रायगड रॉयल्सचा रवींद्र जाधव यांचा समावेश आहे.






