पुणे । सौरभ देवरेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सिमन्स संघाने अॅटॉस सिंटेल संघावर सहा गडी राखून मात करून प्रथम स्पोर्ट्स आयोजित पुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अॅटॉस सिंटेल संघाने दिलेले १७६ धावांचे लक्ष्य सिमन्सने १८.३ षटकांत ४ गडींच्या मोबदल्यात सहज साध्य केले. नेहरू स्टेडियमवर ही लढत झाली.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी उदयोजक शशी काटे,अक्षय शितोळे, सी.एल. कुलकर्णी, किरण इंगळे, प्रकाश अवचट,भाई लोखंडे, अमित जगताप, अशोक शर्मा, सुजय निकम, भाऊसाहेब डांगे उपस्थित होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना सौरभ जळगावकर आणि हिमांशू अगरवाल खातेही न उघडता माघारी परतली. यानंतर अतुल पवार आणि विशाल रैना यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांनाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे सिमन्सची ११ षटकांत ४ बाद ७९ अशी स्थिती झाली होती.
यानंतर सौरभ आणि मोहंतीने पाचव्या गडीसाठी नाबाद १०१ धावांची भागीदारी करून सिमन्सला ९ चेंडू शिल्लक राखून विजय मिळवून दिला. यात सौरभने ३५ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ६३, तर मोहंतीने २३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारसह नाबाद ४९ धावा केल्या.
तत्पूर्वी, अॅटॉससिंटेल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. अॅटॉससिंटेल संघाने ९ बाद १७५ धावा केल्या. यात जय मेहताने २५ चेंडूंत ३८, तर हर्षद तिडकेने २५ चेंडूंत ३६ धावा केल्या. सौरभने पाच गडी बाद केले. गणेश मिसाळ याने मालिकावीराचा किताब पटकाविला. तर यार्डी सॉफ्टवेअरचा ऋषीकेश पटवर्धन सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि अॅकसेंचर संघाचा आकाश सिंग सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला.
संक्षिप्त धावफलक ।
अॅटॉस सिंटेल – २० षटकांत ९ बाद १७५ (जय मेहता ३८, हर्षद तिडके ३६, वैभव पेडणेकर २५, चिन्मय एम. १७, सौरभ देवरे ५-२३, निखिल पाटील १-४३, मनोज भागवत १-२८) पराभूत वि. सिमन्स – १८.३ षटकांत ४ बाद १८० (सौरभ देवरे नाबाद ६३, सौम्या मोहंती नाबाद ४९, विशाल रैना ३५, अतुल पवार १९, जय मेहता २-२२, संदीप भागवत १-१६). सामनावीर – सौरभ देवरे