---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया; पृथ्वी शॉचे झाले पुनरागमन

On: मंगळवार, फेब्रुवारी 4, 2020 12:49 PM
---Advertisement---

21 फेब्रुवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी आज बीसीसीआयने 16 जणांचा संघ घोषित केला आहे. भारताच्या या कसोटी संघात पृथ्वी शॉचे पुनरागमन झाले आहे. तसेच युवा फलंदाज शुबमन गिलला देखील भारताच्या कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.

शॉ आणि गिलने भारत अ संघाकडून न्यूझीलंड अ संघाविरुद्ध खेळताना चांगली कामगिरी केली आहे. नुकतेच गिलने न्यूझीलंड अ संघाविरुद्ध झालेल्या प्रथम श्रेणीच्या सामन्यात द्विशतकी खेळी केली होती. तर शॉने न्यूझीलंड अ संघाविरुद्ध वनडे मालिकेत दमदार कामगिरी केली होती.

तसेच भारताचा नियमित सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा दुखापतीमुळे उर्वरित न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर पडला असल्याने आता भारताकडे कसोटीसाठी मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल हे सलामीवीर फलंदाज म्हणून पर्याय आहेत.

तसेच न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी  यष्टीरक्षक म्हणून वृद्धिमान सहा आणि रिषभ पंत यांना भारतीय संघात संधी दिली आहे.

याबरोबरच वेगवान गोलंदाज इशांत शर्माचाही भारताच्या संघात तात्पुरता समावेश करण्यात आला आहे. कारण तो काही दिवसांपूर्वी रणजी ट्रॉफीचा सामना खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. तो कसोटी मालिका सुरु होईपर्यंत जर पूर्णपणे तंदुरुस्त झाला, तरच त्याला न्यूझीलंड विरुद्ध खेळवण्यात येणार आहे.

न्यूझीलंड आणि भारतात होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान वेलिंग्टन येथे होणार आहे. तर दुसरा सामना ख्राइस्टचर्च येथे 29 ते 4 मार्च दरम्यान होणार आहे. या कसोटी मालिकेपूर्वी भारत आणि न्यूझीलंड संघ 5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत.

वनडे मालिकेसाठी दुखापतग्रस्त रोहित ऐवजी मयंक अगरवालची बदली खेळाडू म्हणून भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. रोहितला न्यूझीलंड विरुद्ध टी20 मालिकेतील शेवटचा सामना खेळताना पोटरीची दुखापत झाली होती.

असा आहे भारताचा कसोटी संघ – 

विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, ईशांत शर्मा (तात्पूरता समावेश)

https://twitter.com/BCCI/status/1224518987016331265

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---