वुमेन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 च्या चौथ्या सिझनमध्ये लीग स्टेजमधील शेवटचा सामना 1 फेब्रुवारीला दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्समध्ये खेळला जाणार आहे. मात्र, या सामन्यापेक्षा अधिक लक्ष वेधून घेतले आहे ती मुंबई इंडियन्सची परिस्थिती. 30 जानेवारीला त्यांनी गुजरात जायंट्सविरुद्ध आपला लीगमधील अंतिम सामना खेळला ज्यामध्ये त्यांचा 11 धावांनी पराभव झाला. त्यामुळे आता एलिमिनेटरमध्ये त्यांची जागा पक्की होणार की नाही, हे दिल्ली-विरुद्ध किंवा यूपी-विरुद्धच्या सामन्याच्या निकालावर अवलंबून राहणार आहे.
मुंबई इंडियन्सचा पराभव ही प्रत्येकासाठी आश्चर्यकारक होती, परंतु संघ अद्याप पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. इंडियन्सने 8 सामन्यांमध्ये 6 गुण मिळवले आहेत, तर त्यांचा नेट रनरेट 0.059 आहे. गुजरात जायंट्स विरुद्ध 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, कर्णधार हरमनप्रीत कौरने 48 चेडूंमध्ये नाबाद 82 धावांची जोरदार खेळी खेळली, पण इतर खेळाडूंचा पुरेसा सहभाग नसल्यामुळे सामना गमावावा लागला.
या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या भवितव्यावर आता दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्सच्या अंतिम सामन्याचा परिणाम निर्णायक ठरणार आहे. दिल्लीसाठी परिस्थिती थोडी सोपी आहे; त्यांनी फक्त सामना जिंकला की एलिमिनेटरमध्ये प्रवेश नक्की होईल. सध्या दिल्ली 7 सामन्यांमध्ये 6 गुणांसह असून त्यांचा नेट रनरेट -0.164 आहे.
दुसरीकडे, यूपी वॉरियर्ससाठी परिस्थिती अवघड आहे. त्यांनी 7 सामन्यांमध्ये फक्त 4 गुण मिळवले आहेत आणि त्यांचा नेट रनरेट -1.146 आहे. त्यामुळे यूपी वॉरियर्सला जिंकण्यासाठी मोठ्या फरकाने सामना जिंकणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांची एलिमिनेटरमध्ये प्रवेशाची शक्यता कमी आहे.






