अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav breaks Virat Kohli’s record) शानदार अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात भारताकडून अर्धशतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज ठरला. आपल्या या खेळीच्या जोरावर त्याने विराट कोहलीचा (Virat Kohli) एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
सूर्याने मैदानात चौफेर फटकेबाजी करत प्रेक्षकांची मने जिंकली. त्याने 49 चेंडूंमध्ये 84 धावांची तडाखेबंद खेळी केली, ज्यामध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. सूर्याने 171.42 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. विशेष म्हणजे, या सामन्यात भारताचे इतर मुख्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. सलामीवीर अभिषेक शर्माला तर आपले खातेही उघडता आले नाही, तर रिंकू सिंगने 14 चेंडूत केवळ 6 धावा केल्या.
सूर्याने आपल्या या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारा तो आता भारताचा दुसरा यशस्वी कर्णधार बनला आहे. या यादीत रोहित शर्मा 92 धावांसह (ऑस्ट्रेलियाविरुद्ध, 2024) पहिल्या क्रमांकावर आहे. आता सूर्या 84 धावांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
यापूर्वी विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर होता, ज्याने 2021 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 57 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताची सुरुवात खूपच खराब झाली होती. ईशान किशनने 16 चेंडूत 20 धावा केल्या, तर अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. शिवम दुबेलाही खातं उघडता आलं नाही. भारताने पॉवरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये 4 गड्यांच्या बदल्यात केवळ 46 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर सूर्याने सूत्रे हातात घेतली आणि अप्रतिम खेळ करत टीम इंडियाला 161 धावांपर्यंत मजल मारून दिली.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
रोहित शर्मा: 92 धावा (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2024)
सूर्यकुमार यादव: 84 धावा (विरुद्ध यूएसए, 2026)
विराट कोहली: 57 धावा (विरुद्ध पाकिस्तान, 2021)
एमएस धोनी: 45 धावा (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2007)






