इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचा लिलाव (IPL Auction 2022) काही दिवसांपूर्वी पार पडला. या लिलावात अनेक युवा खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागली. मात्र, याचवेळी अनेक दिग्गजांमध्ये कोणत्याच फ्रँचायझीने रस दाखवला नाही. यात सुरेश रैना (Suresh Raina) याचा देखील समावेश होता. रैनाला देखील कोणत्याच संघाने खरेदी केले नाही. त्यामुळे तो यंदा आयपीएल २०२२ हंगामात खेळताना दिसणार नाही. त्यामुळे त्याची बरीच चर्चा होत आहे.
खरंतर ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखला जाणारा रैना चेन्नई सुपर किंग्स या संघातील एक महत्त्वाचा खेळाडू होता. तो जवळपास १० वर्षे चेन्नई संघासाठी खेळला होता. असे असतानाही चेन्नईने त्याला आयपीएल २०२२ साठी संघात स्थान दिले नाही. आता याबद्दल न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू सायमन डूल (Simon Doull) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
सायमन डूल यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितले की, ‘रैनाला खरेदी न करण्यामागे दोन-तीन कारणे आहेत. युएईमध्ये जेव्हा स्पर्धा झाली तेव्हा त्याने धोनीचा विश्वास गमावला. आपल्याला तेव्हा काय झाले हे सांगायची गरज नाही. त्याबद्दल अनेक तर्कही लावण्यात आले. रैनाने संघाबरोबरच कर्णधार एमएस धोनीचाही विश्वास गमावला. जेव्हा एकदा तुम्ही तसं करता, त्यानंतर संघ तुम्हाला पुन्हा खरेदी करणे कठीण असते.’
धोनी आणि रैनाची मैत्री होती एक उदाहरण
खरंतर एमएस धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना यांची मैत्री अनेकांसाठी एक उदाहरण आहे. त्या दोघांनी एकत्रच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, त्याचदिवशी रैनानेही निवृत्ती घेत असल्याचे सांगितले होते. तसेच रैना अनेकदा धोनीबरोबरी आपल्या चांगल्या मैत्रीबद्दल भाष्य करायचा.
आयपीएल २०२० ने रैनाच्या आयपीएल कारकिर्दीला धक्का
खरंतर कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२० युएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रैना चेन्नई संघासह दुबईला पोहचला होता. पण, त्यानंतर स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वी त्याने अचानक त्या हंगामातून माघार घेत असल्याचे सांगितले आणि तो मायदेशी परतला. त्याच हंगामात चेन्नईची कामगिरी सर्वात खराब झाली आणि चेन्नई पहिल्यांदाच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली होती. त्यावेळी रैनाच्या माघार घेण्याच्या निर्णयाबद्दल बरीच चर्चा झाली होती.
पण, असे असले तरी या हंगामानंतर रैनाने २०२१ आयपीएल हंगामासाठी चेन्नई संघात पुनरागमन केले. मात्र त्याची कामगिरी खालावली होती. मात्र, या हंगामात चेन्नई संघाने विजेतेपद जिंकले होते.
दरम्यान, चेन्नईने आयपीएल २०२२ साठी लिलावातून आपले अनेक जूने शिलेदार पुन्हा खरेदी केले आहेत. यात ड्वेन ब्रावो, दीपक चाहर, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, मिशेल सँटेनर अशा अनेका खेळाडूंचा समावेश आहे. तसेच लिलावापूर्वी चेन्नईने धोनीसह रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांना संघात कायम केले होते.
रैनाची आयपीएलमधील कामगिरी
रैनाने आयपीएलमध्ये २०५ सामने आत्तापर्यंत खेळले असून ५५२८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १ शतक आणि ३९ अर्धशतके केली आहेत. तसेच रैना २००८ ते २०१५ आणि २०१८ ते २०२१ पर्यंत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला, तर २०१६ आणि २०१७ साली तो गुजरात लायन्स संघाचा भाग होता.
महत्त्वाच्या बातम्या –
दुसरी टी२०: नाणेफेक जिंकून पोलार्डचा गोलंदाजीचा निर्णय, वेस्ट इंडिज संघात खतरनाक अष्टपैलूचे पुनरागमन
“तेव्हा धोनी पाठीवर थाप मारत म्हणालेला आजचा दिवस तुझा नव्हता”