भारतीय संघ येत्या जुलै महिन्यात तीन टी-२० आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्वपद शिखर धवनला देण्यात आले आहे. तसेच अनेक युवा खेळाडू या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसून येणार आहेत. या संघात नितीश राणा आणि कृष्णप्पा गौतमला देखील संधी देण्यात आली आहे. तसेच नेट गोलंदाज म्हणून इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत इशान, संदीप, अर्शदीप आणि साई किशोर यांनी आपल्या गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. परंतु सिमरजीत सिंग याला फार कोणी ओळखतही नाही. २३ वर्षीय सिमरजीत सिंगला पहिल्यांदाच वरिष्ठ संघात स्थान देण्यात आले आहे. तो श्रीलंका दौऱ्यावर नेट गोलंदाजाची भूमिका पार पाडणार आहे.
सिमरजीत सिंगची कामगिरी
सिमरजीत सिंग याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या मागच्या हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने ५.६५ च्या इकॉनॉमिने ११ गडी बाद केले होते. या हंगामात तो दिल्ली संघासाठी संयुक्तपणे सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज होता. सिमरजीत सिंगने २०१८ मध्ये हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते.
तसेच त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने दिल्ली संघासाठी १० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याला ३७ गडी बाद करण्यात यश आले आहे. तर, १९ लिस्ट ए सामन्यात त्याला १८ गडी बाद करण्यात यश आले आहे.
असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज – इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
WTC फायनलसाठी भज्जीची ३०३ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला नापसंती; म्हणे, ‘त्याला बसवा बाहेर’
इशान आणि पंत यांच्यातील ‘मॅचविनर’ कोण? आकडेवारीचं झुकतं माप ‘या’ खेळाडूच्या बाजूने