भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शनिवारी (30 मे) सिंगापूर बॅडमिंटन ओपन 2026 च्या पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरीत विश्वविजेते आणि जागतिक क्रमवारीत असलेल्या किम वॉन हो आणि सेओ सेउंग जाए यांना पराभवाचा धक्का दिला आहे.
चौथ्या मानांकित या भारतीय जोडीने 52 मिनिटे चालेल्या अटीतटीच्या उपांत्य सामन्यात दक्षिण कोरियाच्या जोडीला 21-19, 21-18 अशा फरकाने पराभूत केले. सात्विक-चिरागचा हा दक्षिण कोरियाच्या जोडीवरील पहिला विजय ठरला.
संपूर्ण सामन्यात भारतीय जोडीला बराच घाम गाळावा लागला. पहिल्या गेमच्या मध्यांतरापर्यंत कोरियन जोडीकडे 13-11 अशी आघाडी होती, भारतीय जोडीने शेवटच्या टप्प्यात आपला खेळ उंचावला आणि सामन्याचे चित्र पालटून टाकणारी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
दुसऱ्या गेममध्येही पुन्हा एकदा कोरियन जोडीने 14-11 आघाडी घेतली होती, तेव्हा सात्विक-चिरागने आपला खेळ अधिक तीव्र करत सलग सहा गुण मिळवले. भारतीय जोडीने महत्त्वाच्या रॅली जिंकून आणि निर्णायक संधींचा फायदा घेत सामन्यावर आपले नियंत्रण मिळवले.
दुसरा गेम 21-18 ने जिंकत भारतीय जोडीने संस्मरणीय विजय मिळवला. त्याचबरोबर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी ठरली. तसेच दक्षिण कोरियाच्या जोडीला ३५ सामन्यांमधील पहिला पराभवाचा सामना करावा लागला. सात्विक-चिरागचा हा कोरियन जोडीवर पहिला-वहिला विजय होता, ज्यांनी गेल्या वर्षी मलेशिया ओपनच्या उपांत्य फेरीत आणि चायना मास्टर्सच्या अंतिम सामन्यात त्यांना पराभूत केले होते.
रविवारी (31 मे) होणाऱ्या या सुपर 750 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीचा सामना चीनच्या लियांग वेई केंग-वांग चांग किंवा इंडोनेशियाचे प्रतिस्पर्धी फजर अल्फियान-मुहम्मद शोहिबुल फिक्री यांच्यापैकी एकाशी होईल.






