क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते आणि त्यासाठी वेळ, वार, मुहुर्त नसतो. हेच कारण असेल कदाचित क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ असेही म्हणतात. हरलेले सामने विजयात बदलतात आणि जिंकलेले सामने पराभवात बदलतात, त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेट पहिले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक प्रसंगी फलंदाजांनी विरोधी संघांच्या तोडांतील विजयाचा घास हिसकावून घेतले आहेत.
क्रिकेटचे सामने शेवटच्या चेंडूपर्यंत गेल्याचे अनेकवेळा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाहायला मिळाले आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघ विजयच्या जवळ असतानादेखील फलंदाजांनी आपल्या बॅटने सामना आपल्या बाजूने वळवला आहे. शेवटच्या चेंडूवर फलंदाजाने संघाला विजय मिळवून दिल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा पाहायला मिळाले आहे.
अनेकवेळा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला गेला आणि अनेकवेळा धावा करून आणि धावा घेऊनही संघाला विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे काही फलंदाजांनी शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला आहे. या लेखात अशा सहा फलंदाजांचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवणारे फलंदाज
१. जावेद मियाँदाद (पाकिस्तान)
साल १९८६ मध्ये शारजाहमध्ये खेळताना जावेद मियाँदादने चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय मिळवून दिला होता. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने २४६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जावेद मियाँदादचा षटकार आजही स्मरणात आहे. या षटकाराचा परिणाम अनेक वर्षे दोन्ही देशांदरम्यान दिसत होता.
२. लान्स क्लुसनर (दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिकेच्या लान्स क्लुसनरने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून न्यूझीलंडचा पराभव केला होता. नेपियरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १९९९ मध्ये लान्स क्लुजनरने दक्षिण आफ्रिकेसाठी शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. सामना ४० षटकांचा करण्यात आला होता. या सामन्यात क्लुसनरने डिऑन नॅशच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला. दक्षिण आफ्रिकेला फक्त चार धावांची गरज असताना त्याने षटकार ठोकला होता.
३. ब्रेंडन टेलर (झिम्बावे)
झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने बांगलादेशच्या मश्रफी मोर्तझाला शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. २००६ मध्ये हरारे येथे त्याने हा कारनामा केला होता. विजयासाठी पाच धावांची गरज पाहून टेलरने हवाई शॉट मारताना सहा धावा काढल्या होत्या.
४. शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज)
साल २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध वेस्ट इंडिजला विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूत १० धावांची गरज होती. चंद्रपॉलने पाचव्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला होता. विशेष म्हणजे त्याच्यासमोर चामिंडा वास गोलंदाजी करत होता.
५. दिनेश कार्तिक (भारत)
श्रीलंकेत झालेल्या निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकने षटकार ठोकत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिले. या टी२० सामन्यात दिनेश कार्तिकने धडाकेबाज खेळी करताना अवघ्या ८ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.
६. रायन मॅकलॅरेन (दक्षिण आफ्रिका)
साल २०१३ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात आठ धावांची गरज होती. मॅक्लारेनने जेम्स फ्रँकलिनच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पुल शॉटने षटकार खेचत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
तामिळनाडूने विजेतेपद पटकावताच दिनेश कार्तिक भावूक, ट्विट करत दोन वर्षांपूर्वी आठवणींना दिला उजाळा
न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीत युवा शुबमन गिलला मिळणार नवी जबाबदारी?
“बेबी क्या कर रहे हो?” शिखर धवनचा मजेशीर व्हिडिओ पाहून हसून हसून व्हाल लोट पोट