चेन्नई : चेन्नई येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिया सावंत हिने शंभर मीटर्स धावण्याची शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा मान मिळविला. याच शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋजुला भोसले हिने कांस्यपदकाची कमाई केली.
मुलींच्या शंभर मीटर्स धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या सिया हिने १२.१० सेकंद वेळ नोंदवीत चमकदार कामगिरी केली. हेच अंतर ऋजुला हिने १२.२३ सेकंदात पार केले. सिया ही मुंबई येथे रवी बागडी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असून तिने यापूर्वी चंद्रपूर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली होती. पंचकुला येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत तिने महाराष्ट्राला दिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकून दिले होते.
पुण्याच्या सणस मैदानावर संजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या ऋजुला हिची ही पहिलीच खेलो इंडिया स्पर्धा आहे. ती सिंहगड स्प्रिंग डेल महाविद्यालयात इयत्ता अकरावी शास्त्र शाखेत शिकत आहे. या स्पर्धेतील पदार्पणातच पदक मिळाल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे आणि यापुढेही असेच यश मला मिळवायचे आहे असे तिने शर्यत संपल्यानंतर सांगितले.
मल्लखांब मध्ये शार्दूल ऋषिकेश याचा दुहेरी धमाका ; मृगांक पाथरे व सई शिंदे यांचेही सोनेरी यश
महाराष्ट्राच्या शार्दूल ऋषिकेश वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपदा पाठोपाठ टांगत्या मल्लखांब प्रकारात सुवर्णपदक जिंकून दुहेरी धमाका केला. तसेच त्याने दोरीच्या मल्लखांब प्रकारात रौप्य पदक पटकावीत आपल्या खात्यात आणखी एक पदकाची भर घातली. पुरलेल्या मल्लखांब प्रकारात मृगांक पाथरे हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
मुलींच्या विभागात सई शिंदे हिने पुरलेल्या मल्लखांब प्रकारात सुवर्णपदक जिंकले तर पलक चुरी हिला कांस्यपदक मिळाले. दोरीच्या मल्लखांब प्रकारात प्रणाली मोरे हिने रौप्य पदक जिंकले. महाराष्ट्राने मल्लखांब या क्रीडा प्रकारात यंदा सहा सुवर्ण, तीन रौप्य व एक कांस्य अशी पदकांची दशक पूर्ती केली.
देविकाचा सुवर्ण‘पंच’; गौरव चव्हाणला रौप्य
बॉक्सिंगमध्ये देविका घोरपडे हिने अंतिम लढतीत हरियाणाच्या निधीला सहज पराभूत करताना ५०-५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले. देविकाने उपांत्य फेरीत गतवर्षीची सुवर्णपदक विजेती हरियाणाच्या मोहिनीला पराभूत करून आधीच सुवर्णपदक अधोरेखीत केले होते. सुवर्णपदकाच्या लढतीत अपेक्षेप्रमाणे देविकाने निधीला सहज पराभूत केले. या स्पर्धेतील देविकाचे हे चौथे पदक ठरले. मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंगचे धडे गिरविणारी देविका सध्या छत्रपती संभाजीनगर येथील ‘साई’ अकादमीमध्ये सनी गेहलावत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. मुलांच्या ६०-६३ किलो वजनी गटात अकोल्याच्या गौरव चव्हाणने रौप्यपदक मिळविले. अंतिम फेरीत हरयाणाच्या यशवर्धन सिंगचे आव्हान गौरवला परतवून लावता आले नाही, त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. गौरव हा क्रीडा प्रबोधिनी अकोला येथे सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना सर्वसाधारण विजेतेपद
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिम्नॅस्टिक्समध्ये शेवटच्या दिवशीही वर्चस्व गाजवित मुले व मुली या दोन्ही गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकाविण्याचा पराक्रम केला. आर्यन दवंडेने यंदाच्या या स्पर्धेत आज आणखी दोन सुवर्णपदकांची भर घालून सोनेरी चौकार लगावला. शताक्षी टक्के हिने देखील सोनेरी कामगिरी करत महाराष्ट्राच्या यशात कौतुकाचा वाटा उचलला. आर्यनने समांतर बार या प्रकारात सुवर्णपदक जिंकताना १२.५०० गुणांची नोंद केली. त्याने व्हॉल्ट टेबल या प्रकारातही १३.२०० गुणांची कमाई करीत सुवर्णपदक जिंकले. त्याचा सहकारी सिद्धांत कोंडे याने १२.९५० कांस्यपदकाची कमाई केली. आर्यनने याआधी या स्पर्धेत वैयक्तिक सर्वसाधारण व फ्लोअर एक्झरसाईज या प्रकारातही सुवर्णपदक जिंकले होते, तर रिंग्ज प्रकारात कांस्यपदक पटकाविले होते. मुलींच्या फ्लोअर एक्झरसाईज या प्रकारात शताक्षी टक्के व तेलंगणाची निशिका अगरवाल यांचे प्रत्येकी ११.५०० गुण झाले. त्यामुळे सादरीकरणातील अचूकता व कलात्मकता याच्या आधारे शताक्षी हिला सुवर्णपदक, तर निशिकाला रौप्यपदक बहाल करण्यात आले. शताक्षी हिने नुकत्याच झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. तसेच गतवर्षी तिला खेलो इंडिया स्पर्धेतही कांस्यपदक मिळाले होते. ती पुण्यातील माउंट कार्मेल कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहे. शताक्षी व सिद्धांत कोंडे हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अजित जरांडे यांच्या इन्फिनिटी जिम्नॅस्टिक अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत. मुलींच्या बॅलन्सिंग बीम या प्रकारात महाराष्ट्राच्या सारा राऊळ व कृष्णा शहा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकाविले.
सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद
महाराष्ट्र संघाने सायकलिंगमध्ये मुलांच्या गटात सर्वसाधारण विजेतेपदाला गवसणी घातली, मुलींच्या गटात उपविजेतेपद मिळविले. सायकलिंगच्या कयरिंग या प्रकारात पुण्याच्या वेदांत जाधवने सुवर्णपदक प्राप्त केले. या स्पर्धेतील त्याचे हे दुसरे सुवर्ण ठरले. यापूर्वी वेदांतने सायकल ट्रॅकवर वैयक्तिक २०० मीटर स्प्रींट प्रकारात सुवर्णपदकाची शर्यत जिंकली होती. या स्पर्धेत एकूण त्याने २ सुवर्ण आणि २ रौप्य पदकांची कमाई केली आहे. पुण्यात प्रशिक्षक दर्शन बारगुजे व दिपाली पाटील यांचे मार्गदर्शनावाखाली सराव करणार्या वेदांतला भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळावायचे असल्याचे त्याने शर्यतीनंतर बोलताना सांगितले. महाराष्ट्राच्याच वेदांत ताजणे याने महाराष्ट्राला दुसरे कांस्यपदक मिळवून दिले. नाशिकच्या ताजणे सध्या दिल्लीत खेलो इंडिया अकादमीत सराव करत असून या स्पर्धेत त्याने वैयक्तिक २०० मीटर स्प्रींट या प्रकारात काल कांस्यपदकाची कमाई केली होती.
टीम स्प्रींट प्रकारात रौप्यपदक
सायकलिंग स्पर्धेतील मुलांच्या गटाच्या टीम स्प्रींट प्रकारात महाराष्ट्राने रौप्य पदक मिळविले होते. यात संघात मंथन लाटे, वेदांत ताजणे व वेदांत जाधव या तिघांचा समावेश होता. मुलींच्या याच प्रकारात महाराष्ट्राने कांस्य पदक राखले होते. या संघात स्नेहल माळी, सायली अरंडे व श्रीया लालवाणी यांचा समावेश होता. वैयक्तिक २०० मीटर स्प्रींट प्रकारात वेदांत जाधवने सुवर्ण, तर वेदांत ताजणेने कांस्यपदक मिळविले होते. आज झालेल्या कायरीन प्रकारात वेदांत जाधवने सुवर्ण तर वेदांत ताजणे याने कांस्य पदक राखले होते.
स्क्वाशमध्ये महाराष्ट्राला रौप्यपदक
मुलींच्या टीम इव्हेंट प्रकारात महाराष्ट्र संघाने रौप्य पदकाची कमाई केली. तामिळनाडू संघाने अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाला पराभूत केले. निरुपमा दुब्ो, अनिका दुबे, रीवा निंबाळकर व अलिना शहा यांच्या संघाने प्रथमच रौप्य पदकापर्यंत मजल मारली. वैयक्तिक प्रकारामध्ये देखील काल निरुपमा दुबेने रौप्य पदकाची कमाई केली होती.
तलवारबाजीत मुलांना कांस्यपदक
तलवारबाजीतील साब्रे टीम इव्हेंट या प्रकारात १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने कांस्यपदकाची कमाई केली आहे. या संघात शिरीष अंगळ, हर्षवर्धन औताडे, मयूर ढसाळ व स्पर्श जाधव यांचा समावेश आहे. या संघाला अजय त्रिभुवन अजिंक्य दुधारे यांचे मार्गदर्शन लाभले.
बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात
महाराष्ट्राला बास्केटबॉल मधील मुलींच्या गटात अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आले. चुरशीने झालेल्या सामन्यात बलाढ्य पंजाब संघाने महाराष्ट्राला ८१-७२ असे पराभूत केले. पूर्वार्धात पंजाबकडे ३७-३२ अशी आघाडी होती. पंजाबकडून नीलम राणी (२४) व मनमित कौर (२०) यांनी उत्कृष्ट खेळ केला तर महाराष्ट्राकडून अनन्या भावसार (१७)व शोमिरा बिडये (१५)यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. उद्या तिसऱ्या क्रमांकासाठी महाराष्ट्राला मध्य प्रदेशबरोबर खेळावे लागणार आहे.