पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने हार्दिक पंड्याच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर सर्वबाद ४८७ एवढी मजल मारली. श्रीलंकेची आता ६४ वर ४ बाद अशी बिकट स्थिती आहे.
फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाला वेगवान भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीचा सामना करणे मुश्किल झाले. शमीने या सत्रात ६ षटके टाकली. त्यातील एक निर्धाव षटक होते. यात त्याने श्रीलंकेच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत परत पाठवले. श्रीलंकेला या मालिकेत जणू काही संकटांनी चारही बाजूनी गाठले आहे.
त्यानंतर श्रीलंकेचा नंबर ३ चा फलंदाज कुशल मेंडिस धावबाद झाला. तो फक्त १८ धावा करू शकला. त्यानंतर श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजही हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. अँजेलो मॅथ्यूजला तर भोपळा ही फोडता आला नाही.
श्रीलंकेची फलंदाजी या पहिल्या सामान्यांपासून सुरु असलेली निराशाजनक कामगिरी या सामन्यातही सुरूच आहे. पण या वेळेस भारतीय फिरकी गोलंदाजांनी नाही तर वेगवान गोलंदाजानी श्रीलंकेच्या फलंदाजांच्या दांड्या उडवल्या आहेत.
आता श्रीलंकेकडून कर्णधार दिनेश चंडिमल १३ वर तर यष्टीरक्षक निरोशन डिकवेला १६ धावांवर खेळत आहेत.