कोलंबो: येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत मजबूत स्थितीत आहे. श्रीलंकेचा पहिला डाव १८३ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर दुसऱ्या डावात लंकेची २ बाद २०९ अशी अवस्था आहे.
आज श्रीलंकेने कालच्या २ बाद ५० वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. परंतु यष्टीरक्षक निरोशन डिकवेल्ला सोडून कोणताही फलंदाज विशेष चमक दाखवू शकला नाही. दिनेश चंडिमल(१०), अँजेलो मॅथेवस(२६) धनंजया डी सिल्वा (०) आणि कुशल मेंडिस (२४), निरोशन डिकवेल्ला (५१), दिलरुवान परेरा (२५), रंगाना हेराथ (२), नुवान प्रदीप (०) हे फलंदाज पहिल्या डावात बाद झाले तर मलिंदा पुष्पाकुमारा (१५*) नाबाद राहिला.
पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांमध्ये अश्विनने ५ जडेजाने २ उमेश यादव १ आणि मोहम्मद शमी २ यांनी विकेट्स घेतल्या.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाल्यामुळे श्रीलंकेला फॉलो ऑन दिला. तिसऱ्याच षटकात उपुल तरंगा २ धावांवर बाद झाला. त्याचा उमेश यादवने त्रिफळा उडवला. त्यानंतर आलेल्या कुशल मेंडिस आणि सलामीवीर दिमुथ करुणरत्ने यांनी मात्र भारतीय फलंदाजांना चांगलाच घाम गाळायला लावला. दिवसाची शेवटची ५ षटके बाकी असताना कुशल मेंडिस ११० धावांवर बाद झाला. त्याला हार्दिक पंड्याने बाद केले.
दिमुथ करुणरत्ने सध्या ९२ धावांवर टिच्चून फलंदाजी करत असून त्याला कसोटी पदार्पण करत असलेला मलिंदा पुष्पाकुमारा २ धावांवर साथ देत आहे.
सध्या भारताकडे २३० धावांची आघाडी असून भारताचा एक डाव खेळणे बाकी आहे.