---Advertisement---

जोस द बॉस! श्रीलंकेविरुद्ध खेळताच बटलरने मोडला जेम्स अँडरसनचा ‘हा’ बलाढ्य विक्रम

On: सोमवार, फेब्रुवारी 2, 2026 11:22 AM
---Advertisement---

इंग्लंडचा विकेटकीपर-फलंदाज जोस बटलरने रविवारी (१ फेब्रुवारी) मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ही कामगिरी त्याने श्रींलेकविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यादरम्यान केली. ३५वर्षीय खेळाडूने तो विक्रम करताच दिग्गज गोलंदाज आणि संघ सहकारी जेम्स अँडरसनचा विक्रम मागे पडला आहे. अँडरसनने इंग्लंडसाठी ४०१ आंतरराष्ट्रीय सामने खेळताना ९९१ विकेट्स घेतल्या आहेत.

आता इंग्लंडसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या बाबतीत बटलर पहिल्या स्थानावर आला आहे. त्याने आतापर्यंत ४०२ सामन्यात खेळताना १२३०८ धावा केल्या आहेत. त्याने ५७ कसोटी सामन्यांमध्ये २९०७ धावा केल्या आहेत. यातील १०० डावांमध्ये खेळताना त्याने ३१.९४च्या सरासरीने धावा करताना दोन शतके आणि १८ अर्धशतके केली आहेत.

बटलरने इंग्लंडकडून आतापर्यंत १९९ वनडे सामने खेळले आहेत. त्यातील १७१ डावांमध्ये ३९.११च्या सरासरीने ५५१५ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ११ शतके आणि २९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर १४६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात त्याच्या नावावर एक शतकही आहे. यामध्ये त्याने २८ अर्धशतकांसह ३९२५ धावा केल्या आहेत.

बटलरने त्याच्या कारकिर्दीत इंग्लंडकडून दोन वेळा मर्यादीत षटकांचा विश्वचषक जिंकला आहे. त्याने २०१९च्या विश्वचषकात फलंदाजीत उत्तम कामगिरी केली होती. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ५९ धावा करताना तेव्हाचा कर्णधार बेन स्टोक्ससोबत ११० धावांची महत्वाची भागीदारीही केली होती. त्याचबरोबर त्याने सुपर ओव्हरमध्ये मार्टिन गप्टीलला देखील धावबाद केले ज्यामुळे संघाने इतिहासात पहिल्यांदा वनडे विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली.

तसेच बटलर आगामी टी२० विश्वचषकासाठी संघातही आहे. या स्पर्धेत इंग्लंडचे नेतृत्व हॅरी ब्रूक करणार आहे. सध्या त्यांचा संघ श्रीलंका दौऱ्यावर असून वनडे मालिका २-१ अशी जिंकली असून टी२० मालिकेतही २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. यातील शेवटचा टी२० सामना ३ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.

टी २० विश्वचषकात इंग्लंडचा पहिला सामना ८ फेब्रुवारीला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणारा हा सामना नेपाळ विरुद्ध असणार आहे.

टी-२० विश्वचषक २०२६साठी इंग्लंडचा संघ– हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, सॅम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जोश टंग, ल्यूक वुड.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---