भारतीय महिला संघाने श्रीलंका दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली आहे. टी-२० मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले. उभय संघातील दुसरा सामना शनिवारी (२५ जून) खेळला गेला, जो भारताने ५ विकेट्स राखून जिंकला. विजयामध्ये स्मृती मंधानाने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. यादरम्यान तिने स्वतःच्या २००० टी-२० धावाही पूर्ण केल्या.
भारतीय महिला संघाची २५ वर्षीय उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी आली आणि सर्वात मोठी खेळी देखील केली. तिने ३४ चेंडूत ३९ धावा केल्या आणि संघाला चांगली सुरुवात दिली. भारताने हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या खेळीसह आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये स्वतःच्या २००० धावा पूर्ण करणारी मंधाना ही भारताची तिसरी महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी हरमनप्रीत कौर आणि मिताली राजने वैयक्तिक २००० धावा पूर्ण केल्या होत्या. या दोघींच्या नावावर अनुक्रमे २३७२ आणि २३६४ धावांची नोंद आहे. मंधानाच्या टी-२० कारकिर्दीचा विचार केला, तर तिने आतापर्यंत ८६ टी-२० सामने खेळले आहेत आणि यामध्ये २६ च्या सरासरीने आणि १२० च्या स्ट्राईक रेटने २०११ धावा केल्या आहेत. यामध्ये तिच्या १४ अर्धशतकांचा देखील समावेश आहे. टी-२० मध्ये तिने ८६ धावांची सर्वात मोठी खेळी केली आहे.
पुरुषांमध्ये विचार केला, तर भारताच्या फक्त रोहित शर्मा आणि विराट कोहलीला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैयक्तिक २००० धावा करता आल्या आहेत. या बाबतीत भारताचा महिला संघ पुरुष संघावर भारी पडला आहे. रोहितने त्याच्या कारकिर्दीतील १२५ टी-२० सामन्यांमध्ये ३३१३ धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे विराटने ९७ सामन्यांमध्ये ३२९६ धावा केल्या आहेत.
त्याव्यतिरिक्त केएल राहुल आणि एमएस धोनी यांनी टी-२० मध्ये चांगली कामगिरी केली आहे. राहुलने आतापर्यंत खेळलेल्या ५६ टी-२० सामन्यांमध्ये ४१ च्या स्ट्राईक रेटने १८३१ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतक आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. तर माजी कर्णधार धोनीने खेळलेल्या ९८ टी-२० सामन्यांमध्ये २ अर्धशतकांच्या मदतीने १६१७ धावा केल्या आहेत.
मंधानाची एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारीही चांगली आहे. तिने आतापर्यंत ७१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४२ च्या सरासरीने २७८८ धावा केल्या आहेत. यामध्ये तिच्या ५ शतकांचा आणि २२ अर्धशतकाचा समावेश आहे. १३५ धावा हे तिचे सर्वोत्तम प्रदर्शन राहिले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्या’ एतिहासिक सामन्याचे तिकीट पाहून कपिल देव भावुक
‘प्रशिक्षक नव्हते म्हणून जिंकलो’, १९८३ विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूचे मोठे विधान






