आज आयसीसीने महिला वनडे क्रमवारी जाहिर केली आहे. या क्रमवारीत भारताची प्रतिभाशाली फलंदाज स्म्रीती मंधनाने अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.
तिने न्युझीलंड विरुद्ध पार पडलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 90 धावांची खेळी केली होती. ही मालिका भारतीय महिला संघाने 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.
मंधना मागील वर्षापासून चांगली खेळत असून तीने 2018 पासून 15 वनडे सामन्यात खेळताना दोन शतके आणि 8 अर्धशतके केली आहेत.
तिने फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवताना तीन स्थानांची प्रगती केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे एलिस पेरी आणि मेग लिनिंग्स या दोघी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आल्या आहेत.
याबरोबरच न्यूझीलंडची कर्णधार एमी सदर्थवेट हिने 10 स्थानांची झेप घेत चौथे स्थाप पटकावले आहे. तिने भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत सलग दोन अर्धशतके केली होती. तसेच मागील 10 सामन्यातील हे तिचे चौथे अर्धशतक आहे.
न्यूझीलंडचीच सुझी बेट्स हिने हेमिल्टनमध्ये झालेल्या सामन्यात अर्धशतक केले होते. त्यामुळे तिने 6 वे स्थान मिळवले आहे.
मंधना प्रमाणेच जेमिमा रोड्रीगेज या भारताच्या युवा महिला क्रिकेटपटूने 64 स्थानांची मोठी झेप घेत 61 वे स्थान पटकावले आहे. तीने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडेत मंधनाला चांगली साथ देताना नाबाद अर्धशतकी खेळी केली होती.
तसेच भारतीय महिला वनडे संघाची कर्णधार मिताली राज पाचव्या स्थानावर आहे.
त्याचबरोबर गोलंदाजी क्रमवारीत भारताच्या फिरकीपटू दिप्ती शर्मा, पूनम यादव आणि एकता बिश्त यांची सुधारणा केली आहे.
यादव आणि शर्मा या दोघींनीही प्रत्येकी पाच स्थानांची प्रगती करत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. यादव 8 व्या आणि शर्मा 9 व्या स्थानावर आली आहे. यादवने न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत 6 आणि शर्माने 4 विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच या मालिकेच 5 विकेट्स घेणारी बिश्तने 9 क्रमांकाची प्रगती करत 13 वे स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने पाचव्या स्थानावरुन चौथे स्थान पटकावले आहे.
गोलंदाजी क्रमवारीत पाकिस्तानची सना मीर, ऑस्ट्रेलियाची मेगन शट आणि दक्षिण आफ्रिकेची मरिझान कॅप या अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी ही आहे मोठी खुशखबर
–तेंडुलकर-गांगुलीच्या त्या विक्रमला रोहित शर्माकडून आहे धोका