न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी (२२ मार्च) भारत आणि बांगलादेश महिला संघात आर-पारची लढाई झाली. भारताने या सामन्यात विजय मिळवून उपांत्य सामन्यात पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. बांगलादेश संघ या सामन्यात तब्बल ११० धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत झाला. सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाने या सामन्यात भारताला चांगली सुरुवात दिली आणि सोबतच स्वतःच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंदही केली.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि शेफाली वर्मा (Shafali Verma) या दोघी सलामीवीरांना पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. मंधानाने ५१ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ३० धावा केल्या. तर शेफालीने ४२ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४२ धावा केल्या. कर्णधार मिताली राज एकही धाव करू शकली नाही.
या खेळीनंतर मंधानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्वतःच्या ५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मिताली राज (Mithali Raj) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांच्यानंतर स्मृती तिसरी भारतीय महिला आहे, जिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःच्या ५ हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
स्मृती मंधानाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द
स्मृती मंधानाच्या नावावर आतापर्यंत खेळलेल्या ७० एकदिवसीय सामन्यांमध्ये २७१७ धावा आहेत, तसेच ४ कसोटी सामन्यांमध्ये तिने आतापर्यंत ३२५ धावा केल्या आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिने ८४ सामने खेळले आहेत आणि यामध्ये १९७१ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मंधानाने ५, तसेच कसोटी क्रिकेटमध्ये एक शतक केले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये तिची सर्वोत्तम धावसंख्या ८६ धावा आहे.
विश्वचषकात केलंय शानदार प्रदर्शन
आयसीसी महिला विश्वचषक २०२२ मध्ये मंधानाचे आतापर्यंचे प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताने आतापर्यंत ६ सामने खेळेल आहेत आणि मंधानाने यादरम्यान २५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकले आहे. तिची सर्वोत्तम खेळी १२३ धावांची होती.
बांगलादेशविरुद्धच्या या सामन्याचा विचार केला, तर नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ विकेट्सच्या नुकसानावर २२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संपूर्ण संघ ११९ धावांवर गुंडाळला गेला.
महत्वाच्या बातम्या –
महिला विश्वचषक : दुबळ्या बांगलादेशला हरवत भारताने उपांत्य फेरीच्या आशा ठेवल्या जिवंत
Photo | ‘मिशन आयपीएल’साठी विराट कोहली सज्ज, आरसीबीच्या कँपमध्ये केले आगमन