भारतीय महिला वरिष्ठ क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. ही मालिका १-१ अशी बरोबरीत असून त्यातील हा तिसरा आणि महत्वाचा सामना आज (२१ फेब्रुवारी) ऍडलेड येथे खेळला जात आहे. यामध्ये भारताच्या स्म्रीती मंधनाने विक्रमी खेळी केली आहे.
या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेफाली वर्मा ७ धावा करत बाद झाली. त्यानंतर स्म्रीतीने जेमीमा रोड्रिग्जसोबत संघाचा डाव सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची (८२ चेंडू) भागीदारी केली. या सामन्यातील भारताची ही सर्वोच्च भागीदारी ठरली. यावेळी स्म्रीतीने तिच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील ३३वे अर्धशतक केले.
स्म्रीतीचे हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे आठवे अर्धशतक ठरले. तिने महिलांच्या किंवा पुरूषांच्या टी२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५० पेक्षा अधिक धावा सर्वाधिक वेळा करण्याच्या विक्रमाची संयुक्तपणे बरोबरी केली. याआधी हा विक्रम केवळ भारताच्या विराट कोहलीच्या नावावर होता. स्म्रीतीने या सामन्यात ५५ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकार मारत ८२ धावांवर बाद झाली. जेमीमानेही अर्धशतक केले. तिने ५९ धावा केल्या. यामुळे भारताने २० षटकात ६ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या.
त्याचबरोबर महिला आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक वेळा ७५ ते ९९ धावसंख्येवर बाद होण्याच्या विक्रमाचीही स्म्रीतीने बरोबरी केली आहे. तिने नऊ वेळा या धावसंख्येदरम्यान बाद होण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या बेथ मनीची बरोबरी केली आहे. तसेच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ऑस्ट्रेलियामध्ये महिला फलंदाजांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रमही आता स्म्रीतीच्या नावावर झाला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये महिला क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक ५० पेक्षा धावा करण्याच्या यादीत स्म्रीती दुसऱ्या स्थानावर आली आहे. हे तिचे ऑस्ट्रेलियातील चौथे टी२० अर्धशतक ठरले. या यादीत इंग्लडची हेथर नाइट (५) पहिल्या स्थानावर आहे.
या मालिकेतील पहिला सामना भारताने २१ धावांनी जिंकला आणि दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने १९ धावांनी जिंकला आहे.






