भारतीय महिला संघ (Indian cricket women’s team) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. 24 फेब्रुवारीपासून दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर एक कसोटी सामनाही होईल. या मालिकेत स्मृती मानधनाकडे (Smriti Mandhna) मिताली राजचा (Mithali Raj) मोठा विक्रम मोडण्याची संधी असेल. हा विक्रम आहे महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा. यासाठी स्मृती मानधनाला पुढील 4 सामन्यांत 668 धावा कराव्या लागतील. हे काम कठीण असले तरी अशक्य नाही.
स्मृती मानधनाने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅट मिळून 10,182 धावा केल्या आहेत. जर तिने या दौऱ्यात 92 धावा केल्या, तर ती इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्सला मागे टाकून जगात तिसऱ्या क्रमांकावर येईल. सध्या पहिल्या क्रमांकावर भारताची मिताली राज आहे, जिने 314 डावांत 10,868 धावा केल्या आहेत. मानधनाला हा विक्रम मोडण्यासाठी 687 धावांची गरज आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडची सूजी बेट्स (10,652 धावा) आहे.
स्मृती मानधनाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. तिने कांगारूंच्या विरुद्ध 21 डावांत 48.57 च्या सरासरीने 1020 धावा केल्या आहेत. यात 4 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. याचबरोबर नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेतही तिने 3 डावांत 129 धावा केल्या होत्या. यामध्ये केवळ धावाच नाही, तर षटकारांच्या बाबतीतही स्मृती मानधना इतिहास रचू शकते. वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत ती सध्या 74 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर तिने अजून 2 षटकार मारले, तर ती सोफी डिव्हाईनला (75 षटकार) मागे टाकून जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.






