भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानानं इतिहास रचला आहे. तिनं राजकोट येथे आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार शतक झळकावलं. यासह स्मृतीनं टीम इंडियासाठी सर्वात जलद एकदिवसीय शतकाचा विक्रम मोडला. तिनं अवघ्या 70 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं.
सध्या भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. यावेळी भारताकडून मंधाना आणि प्रतीका सलामीला आल्या. स्मृतीनं सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत चौकार-षटकारांची आतषबाजी सुरु केली. तिनं 70 चेंडूत 100 धावांचा टप्पा गाठला. भारतीय महिला खेळाडूद्वारे वनडेतील हे सर्वात वेगवान शतक आहे. स्मृती या सामन्यात 80 चेंडूत 135 धावा ठोकून बाद झाली. तिनं आपल्या खेळीत 12 चौकार आणि तब्बल 7 षटकार लगावले. या दरम्यात तिचा स्ट्राईक रेट 168.75 एवढा राहिला.
स्मृती मंधानापूर्वी भारतासाठी सर्वात वेगवान वनडे शतकाचा विक्रम हरमनप्रीत कौरच्या नावे होता. तिनं 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 87 चेंडूत शतक झळकावलं होतं. हरमनप्रीतने यापूर्वी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 90 चेंडूत शतक झळकावले होतं. अशाप्रकारे मंधानानं हरमनप्रीतला टाकलं आहे. यासह स्मृती मंंधाना भारतासाठी 10 वनडे शतकं ठोकणारी पहिली महिला खेळाडू बनली आहे.
महिला एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वात कमी चेंडूंमध्ये शतक –
70 – स्मृती मंधाना विरुद्ध आयर्लंड, राजकोट, 2025
87 – हरमनप्रीत कौर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, बंगळुरू, 2024
90 – हरमनप्रीत कौर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, डर्बी, 2017
90 – जेमिमा रॉड्रिग्ज विरुद्ध आयर्लंड, राजकोट, 2025
98 – हरलीन देओल विरुद्ध वेस्ट इंडिज, वडोदरा, 2024
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक (महिला)
मेग लॅनिंग – 15 (102 डाव)
सुझी बेट्स – 13 (162 डाव)
टॅमी ब्यूमोंट – 10 (116 डाव)
स्मृती मंधाना – 10 (97 डाव)
हेही वाचा –
रणजी ट्रॉफीमध्ये विराट कोहलीची बॅट आग ओकते, आकडेवारी पाहून व्हाल थक्कं!
मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानात जाणार
हा खेळाडू बनणार होता टीम इंडियाचा ‘पोस्टर बॉय’, आता संघातही जागा मिळेना!