आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) दरवर्षी प्रत्येक क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम संघाची घोषणा करण्यात येते. त्यानुसार १९ जानेवारी रोजी आयसीसीने (ICC) २०२१ वर्षातील सर्वोत्तम टी२० महिला आणि पुरुष संघाची घोषणा केली आहे. आयसीसीच्या सर्वोत्तम महिला टी२० संघात भारताच्या स्म्रीती मंधना हिला स्थान देण्यात आले आहे.
मंधना ही आयसीसीच्या २०२१ वर्षाच्या सर्वोत्तम टी२० संघात स्थान मिळवणारी एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. भारताच्या एकाही पुरुष क्रिकेटपटूला आयसीसीच्या सर्वोत्तम टी२० संघात स्थान मिळवता आलेले नाही.
भारतीय महिला टी२० संघाची उपकर्णधार असलेल्या मंधनाने २०२१ वर्षात आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ९ सामन्यांत ३१.८७ च्या सरासरीने २५५ धावा केल्या आहेत. यामध्ये तिच्या २ अर्धशतकांचा समावेश आहे. या वर्षात ती भारताची सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू होती. मंधनाला आयसीसीच्या या टी२० संघात सलामी फलंदाज म्हणून स्थान मिळाले आहे.
नेट स्किवरकडे कर्णधारपद
आयसीसीच्या २०२१ सर्वोत्तम टी२० संघाचे कर्णधारपद इंग्लंडच्या नेट स्किवरकडे सोपवण्यात आले आहे. अष्टपैलू क्रिकेटपटू असलेल्या स्किवरने २०२१ वर्षात तिच्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले होते. तिने २०२१ वर्षात ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत १५३ धावा केल्या आणि १० विकेट्सही घेतल्या.
इंग्लंडच्याच टॅमी ब्युमाँटला मंधनासह आयसीसीने सलामीला फलंदाजीसाठी निवडले आहे. तिने २०२१ वर्षात ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ३०३ धावा केल्या आहेत. या संघात स्किवर आणि ब्युमाँटसह इंग्लंडच्या डॅनी वॅट, यष्टीरक्षक एमी जोन्स आणि फिरकी गोलंदाज सोफी इक्लेस्टोन यांनाही स्थान देण्यात आले आहे.
याशिवाय आयर्लंडच्या गॅबी लुईस, दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वूलवॉर्ट, शब्निम इस्माइल आणि मॅरिजन कॅप, झिम्बाब्वेच्या लॉरिन फिरी यांनाही आयसीसीच्या २०२१ सर्वोत्तम महिला टी२० संघात स्थान देण्यात आले आहे.
अधिक वाचा – ICC टी२० ‘टीम ऑफ दी ईयर’ जाहीर! यादी पाहून टीम इंडियाचे चाहते खवळले; एक पण भारतीय कसा नाही?
पुरुष संघात एकाही भारतीयाला स्थान नाही
आयसीसीच्या सर्वोत्तम टी२० संघात एकाही भारतीय पुरुष क्रिकेटपटूला स्थान मिळवता आलेले नाही. या संघात पाकिस्तानचे ३ खेळाडू असून बाबर आझमला कर्णधारपद देण्यात आले आहे. त्याच्याशिवाय मोहम्मद रिजवान आणि शाहिन शाह आफ्रिदी यांनाही या संघात स्थान मिळाले आहे. तसेच इंग्लंडच्या जोस बटलरला, टी२० विश्वचषक २०२१ विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्श आणि जोश हेजलवूडला संधी देण्यात आली आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या एडेन मार्करम, डेविड मिलर आणि तब्राईज शम्सी यांना संधी देण्यात आली आहे.
व्हिडिओ पाहा – द्रविडला ‘जॅमी’ टोपणनाव पडलं तरी कसं?
आयसीसी वर्षातील सर्वोत्तम महिला टी२० संघ – स्म्रीती मंधना, टॅमी ब्युमाँट, डॅनी वॅट, गॅबी लुईस, नेट स्किवर (कर्णधार), एमी जोन्स, लॉला वूलवॉर्ट, मॅरिजन कॅप सोफी इक्लोस्टोन, लॉरिन फिरी आणि शब्निम इस्माइल.
आयसीसी वर्षातील सर्वोत्तम पुरुष टी२० संघ – जोस बटलर, मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), एडेन मार्करम, मिशेल मार्श, डेविड मिलर, तब्राईज शम्सी, जोश हेजलवूड, वनिंदू हसरंगा, मुस्तफिजुर रेहमान आणि शाहिन शाह आफ्रिदी.
महत्त्वाच्या बातम्या –
फलंदाजांनी ठोकले अन् गोलंदाजांनी रोखले! १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताचा आर्यलंडवर दणदणीत विजय
‘अक्षर पटेल’ एक असा भारतीय क्रिकेटर, ज्याच्या आजीच्या स्वप्नांनी भरलं त्याच्या पंखात बळ
‘पालघर एक्सप्रेस’चा दक्षिण आफ्रिकेत बोलबाला!! ‘हा’ पराक्रम करणारा शार्दुल एकमेव भारतीय