भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या बरोबरीनेच भारतीय महिला संघ देखील मार्गक्रमण करताना दिसत आहे. सध्या भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, आता भारताच्या भविष्यातील कर्णधार याविषयी चर्चा सुरू झाली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांनी याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले असून, भारताच्या पुढील कर्णधाराबाबत विचार लवकरच सुरू केला जाईल, असे म्हटले.
ती खेळाडू बनू शकते भारतीय संघाची पुढील कर्णधार
सध्या भारताच्या कसोटी व वनडे संघाचे नेतृत्व अनुभवी मिताली राज करते. दुसरीकडे, टी२० संघाची जबाबदारी आक्रमक फलंदाजी करणाऱ्या हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर आहे. भारताच्या भविष्यातील कर्णधाराविषयी विचारले असता रमेश पोवार म्हणाले,
“कधीतरी याबाबत निर्णय घ्यावाच लागणार आहे. सध्या या चर्चेला उधाण आले असले तरी, याबाबतचा निर्णय आगामी वनडे विश्वचषकानंतरच घेण्यात येईल. याबाबत इतक्यात निर्णय देता येणार नाही.”
भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकही मालिका जिंकण्यात यश आले नाही. एकमेव कसोटी अनिर्णित राहिली तर, वनडे व टी२० मालिकेत संघाला पराभव पत्करावा लागला.
स्मृती करू शकते नेतृत्व
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत शतक ठोकणारी स्मृती मंधाना हिच्याविषयी बोलताना पोवार म्हणाले,
“अशी कामगिरी अनेकांना प्रेरित करत असते. ती जगभरात सर्व ठिकाणी क्रिकेट खेळते आणि तिला खेळाची चांगलीच जाण आहे. सध्या ती टी२० संघाची उपकर्णधार असून, वेळ पडल्यास नेतृत्वही करते. मी याबाबत आत्ताच काही बोलू शकणार नाही. कारण खेळाडू, संघ व्यवस्थापन व बीसीसीआय चर्चेअंती या विषयावर निर्णय देईल.”
स्मृती मंधानाच्या नेतृत्वात ट्रेलब्लेझर संघाने मागील वर्षी वुमेन्स टी२० स्पर्धा जिंकली होती. तसेच ती अनेकदा हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व ही करताना दिसून आली आहे. मितालीचे वय व हरमनप्रीतच्या सततच्या दुखापती यामुळे कदाचित तिला लवकरच भारतीय संघाचे नेतृत्व देण्यात येऊ शकते.