महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेतील महिलांच्या प्रदर्शनीय लढतीला रविवारपासून (दि. 25 जून) सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात ब्लू संघाची फलंदाज शिवाली शिंदे हिने केलेल्या नाबाद 35 धावांच्या खेळीच्या जोरावर ब्लू संघाने यलो संघावर डक वर्थ लुईस नियमानुसार 22 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील शानदार कामगिरीसाठी शिवाली शिंदे प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत महिलांच्या प्रदर्शनीय लढतीत पहिल्या सामन्यात पावसामुळे दोन्ही संघातील सामना प्रत्येकी 15 षटकांचा खेळविण्यात आला. यलो संघाने (Team Yellow) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यलो संघाच्या चिन्मयी बोरपाळेने स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिला झेल बाद करून ब्लू संघाला (Team Blue) पहिला धक्का दिला. पूनम खेमनारने स्मृतीचा झेल टिपला.
ब्लू संघ 7.3 षटकात 1 बाद 57 धावांवर असताना पुन्हा पाऊस सुरू झाला व त्यामुळे सामना थांबविण्यात आला. पुन्हा पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्ही संघातील सामना प्रत्येकी 9 षटकांचा करण्यात आला. याआधी शिवाली शिंदेने 28 चेंडूत 5 चौकारासह नाबाद 35 धावा, तर ऋतुजा देशमुखने 21 चेंडूत 2 चौकारांसह 23 धावा केल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 43 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा खेळ सुरू झाल्यावर ऋतुजा देशमुखला धावचीत बाद केले. ब्लू संघाने 9 षटकात 3 बाद 66 धावा केल्या. परंतु डक वर्थ लुईस नियमानुसार यलो संघाला विजयासाठी 9 षटकात 77 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.
ब्लू संघाचे 77 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या एमसीए यलो संघाला 9 षटकात 4 बाद 54 धावाच करता आल्या. यात कर्णधार तेजल हसबनीस 10 धावांवर खेळत असताना ब्लू संघाच्या प्रियांका गारखेडेने त्रिफळा बाद केले व यलो संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर मुक्ता मगरे (16 धावा), ईशा घुले (19 धावा) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. ब्लू संघाकडून प्रियांका गारखेडे (1-7), माया सोनावणे (1-8), श्वेता सावंत (1-10), श्रद्धा पोखरकर (1-13) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 22 धावांनी विजय मिळवला.
दुसरा सामना मंगळवार, 27 जून रोजी एमसीए यलो संघ विरुद्ध एमसीए रेड संघ यांच्यात दुपारी 1.30 वाजता होणार आहे. (Smriti Mandhana’s Blue team won women’s exhibition match, Shivali won the ‘POM’ award)
सविस्तर निकाल-
ब्लू संघ- 9 षटकात 3 बाद 66 धावा (शिवाली शिंदे नाबाद 35 (28, 5×4), ऋतुजा देशमुख 23 (21, 2×4), मुक्ता मगरे 1-13, चिन्मयी बोरपाळे 1-18)
विरुद्ध यलो संघ- 9 षटकात 4 बाद 54 धावा (ईशा घुले 19, मुक्ता मगरे 16, तेजल हसबनीस 10, प्रियांका गारखेडे 1-7, माया सोनावणे 1-8, श्वेता सावंत 1-10, श्रद्धा पोखरकर 1-13)
महत्वाच्या बातम्या-
बुमराहच्या पुनरागमनावर शास्त्रींची चेतावणी; आफ्रिदीचे उदाहरण देत म्हणाले, ‘तुम्ही त्याला 4 महिने…’
आता बास झालं! निवडकर्त्यांनी पुन्हा दुर्लक्ष करताच सरफराजने तोडले मौन, थेट इंस्टाग्रामवरून साधला निशाणा