पुणे । मोहोर व्हेंचर्स, अॅमनोरा संघांनी अनुक्रमे मुळशी पॅटर्न व एसके ग्रुप संघाला पराभूत करताना एएवाय’एस सॉफ्टबॉल अकादमी व सिस्का एलईडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सॉफ्टबॉल लीग स्पर्धेत विजयी सलामी दिली.
स. प. महाविद्यालायाच्या मैदानावर आजपासून सुरु झालेल्या स्पर्धेत मोहोर व्हेंचर्स संघाने मुळशी पॅटर्न संघाला ३-१ होमरन्सने पराभूत करताना विजयी सलामी दिली. चेतन जोगळेकर, प्रणय भंडारे, चेतन महाडिक यांनी मोहोर संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शुभम काटकर, गौरव राजपुरे यांनी मुळशी पॅटर्न संघाकडून दिलेली लढत अपुरी ठरली.
अतितटीच्या झालेल्या दुसऱ्या लढतीमध्ये अॅमनोरा संघाने एसके ग्रुप संघाला ७-६ अशा होमरन्सने पराभूत करताना विजय साकारला. अॅमनोरा संघाकडून हितेश निर्मळकर, किशन महानंद, सौरभ यादव, निखील नायक यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. एसके ग्रुप संघाच्या विनायक यादव, नयन दवे, कुलदीप पाल यांनी चांगली लढत दिली.
व्होटेक्सा बॅटरीज व बँक ऑफ महाराष्ट्र संघादरम्यान झालेली लढत १-१ अशी अनिर्णीत राहिली. बँक ऑफ महाराष्ट्र संघाकडून आशिष पंडीत, अभिषेक शिंदे, श्रीकांत मारटकर यांनी तर व्होटेक्सा बॅटरीज संघाकडून प्रतिष पाटील, श्रीराम चव्हाण, हेमंत मोहिते यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.
अन्य लढतीत किशन महानंद व नागेश निंबाळकर यांच्या दमदार खेळाच्या जोरावर अॅमनोरा संघाने मुकुल माधव फाउंडेशन संघाला ९-१ होमरन्सने एकतर्फी पराभूत केले. मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने पियुष चांदेकर, अक्षय बनोरे यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.