भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीने बुधवारी (२३ डिसेंबर) एक खास कामगिरी केली. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खेळल्या गेलेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात गांगुलीने जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर सर्वप्रथम अर्धशतक झळकविण्याचा मान मिळविला. गांगुलीने बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या संघाविरुद्ध खेळताना ही कामगिरी केली. मात्र गांगुलीच्या या अर्धशतकानंतरही त्याच्या संघाला या सामन्यात जय शहा यांच्या संघाकडून २८ धावांनी पराभव पत्करावा लागला.
बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (२४ डिसेंबर) अहमदाबादच्या या नूतन स्टेडियममध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या मैत्रीपूर्ण लढतीत सौरव गांगुलीने ३२ चेंडूत ५३ धावांची आक्रमक खेळी साकारली. निवृत्ती घेऊन काही वर्षे लोटली असली तरी आपला दर्जा कायम असल्याचे त्याने सिद्ध केले. गांगुलीने केवळ फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. त्याने ३ षटकांत २६ धावा देत प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार जय शहा यांना बाद केले. जय शहा केवळ २ धावा काढून गांगुलीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाले. मात्र त्यांनी गोलंदाजीत चांगले प्रदर्शन करत गांगुलीच्या संघातील दोन फलंदाजांना बाद केले.
गांगुलीशिवाय या सामन्यात अझरुद्दीनने देखील २२ चेंडूत ३७ धावांची खेळी साकारली. त्याने गोलंदाजीत २ षटके टाकताना ९ धावा दिल्या, मात्र तो बळी मिळवू शकला नाही. तसेच जयदेव शहा यांनी अष्टपैलू खेळ करताना १६ चेंडूत ३८ धावांची वादळी खेळी केली. आणि गोलंदाजीत ४ षटकांत ३९ धावा देताना २ बळी पटकाविले.
बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या संघामध्ये हा मैत्रीपूर्ण सामना खेळला गेला असला तरी मैदानावर लढत चुरशीची आणि रंगतदार झाली. अहमदाबादच्या नवीन बांधल्या गेलेल्या मोटेरा स्टेडियमवरील हा पहिलाच सामना होता. हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम ठरले आहे. एकूण ६३ एकरांवर विस्तारलेल्या या स्टेडियमच्या बांधकामासाठी जवळपास ७५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. मेलबर्न क्रिकेट स्टेडियमपेक्षाही मोठे असलेल्या स्टेडियमची आसनक्षमता सुमारे १ लाख १० हजार प्रेक्षकांची आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
– आयसीसीने जाहीर केली टी२० रँकिग, या भारतीयाने पटकावला तिसरा क्रमांक
– भारताचा माजी फिरकीपटू प्रग्यान ओझाच्या खांद्यावर नवी जबाबदारी, इंडियन क्रिकेटर असोसिएशनच्या प्रतिनिधीपदावर झाली नियुक्ती
– ठरलं तर! २०२१ च्या आयपीएलमध्ये मिस्टर आयपीएल रैना करणार चेन्नईचे प्रतिनिधित्व