भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर धावण्याची स्पर्धा होण्याची शक्यता आहे. हा सगळा किस्सा त्यावेळी समालोचन कक्षात चर्चेत आला ज्यावेळी हे दोन महान फलंदाज पाकिस्तान-विरुद्ध भारत सामन्याच समालोचन करत होते.
भारत- विरुद्ध पाकिस्तान सामन्यात समालोचन करत असताना गांगुली आणि सेहवाग सामन्यादरम्यान एकेरी-दुहेरी धावांच महत्त्व सांगत होते. त्यावेळी गांगुलीने तो क्रिकेट खेळत असताना कशा वेगवान एकेरी-दुहेरी धावा काढायचा याची माहिती सांगितली.
गांगुलीबरोबर ७-८ वर्ष क्रिकेट खेळलेल्या सेहवागने हा मुद्दा खोडून काढत आपण या गोष्टीशी सहमत नसल्याचं सांगितलं. यानंतर २ षटक वाट पाहिल्यावर गांगुलीने काही आकडेवारी सेहवागला सांगितली. त्यात गांगुलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११,३६३ धावा करताना ३६% धावा ह्या एकेरी घेतल्या आहेत तर सेहवागने ८,२७३ धावा करताना फक्त २४% धावा एकेरीच्या रूपात घेतलेले सांगितलं. यामुळे आपण एकेरी धावा घेण्यात सेहवागपेक्षा पुढे असल्याचं गांगुलीला सांगायचं होत.
यावर सेहवागने कडी करत गांगुलीला म्हटले की मी गांगुलीची तुलना विराटच्या एकेरी- दुहेरी धावा करण्याबद्दल करत होतो त्याच्या स्वतःबद्दल नाही.
यावर हजरजबाबी गांगुली म्हणाला की आपल्या एकेरी-दुहेरीबद्दल सेहवागला काही शंका असेल तर चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर सेहवाग आणि त्याच्यात धावण्याची स्पर्धा व्हावी. या वेगवान १०० मीटर स्पर्धेची बातमी वाऱ्यासारखी समालोचन कक्षात पसरली आणि आपण ही स्पर्धा पाहण्यासाठी उतावीळ झालो असल्याची प्रतिक्रिया व्हीव्हीएस लक्ष्मण, गावस्कर यांनी दिली. तसेच त्यांनी स्टार स्पोर्ट्सला या दोघातील स्पर्धेचं आयोजन करण्याची विंनतीही केली.