इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम जरी स्थगित झाला असला तरी भारतीय संघाचे पुढील वेळापत्रक बरेचसे व्यस्त आहे. नुकतेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. आता असे वृत्त येत आहे की कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आणि इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी भारतीय संघ श्रीलंका दौरा करु शकतो.
याबद्दल बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने भाष्य केले आहे. सध्या अशी चर्चा होती कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आणि इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी जो वेळ आहे, त्यावेळात उर्वरित आयपीएल २०२१ स्पर्धा खेळवली जाऊ शकते. मात्र आता गांगुलीने म्हटले आहे की त्यावेळात आयपीएलसाठी कोणतीही विंडो नाही.
स्पोर्टस्टारशी बोलताना गांगुली म्हणाला, ‘नाही. (कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आणि इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी आयपीएल होणार नाही). भारतीय संघाला त्यादरम्यान ३ वनडे आणि ५ टी२० सामने खेळण्यास जायचे आहे. १४ दिवसांचे क्वारंटाईन वैगरे अशा अनेक अडचणी आहेत. त्यामुळे भारतात हे होऊ (आयपीएल २०२१) शकत नाही. क्वारंटाईन सहन करणे कठीण आहे. आम्ही आयपीएल पूर्ण करण्यासाठी कालावधी कसा शोधणार, याबद्दल काही बोलणे घाईचे ठरेल.’
याबरोबरच गांगुलीला विचारण्यात आले की आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यास उशीर केला का, कारण जेव्हा आयपीएल स्थगित झाली तेव्हा कोरोना व्हायरसने आधीच संघांच्या बायोबबलमध्ये प्रवेश केला होता.
यावर उत्तर देताना गांगुली म्हणाला, ‘तुम्ही आता असे म्हणू शकता की आयपीएल लवकर स्थगित करायला हवे होते. मुंबई आणि चेन्नई लेगमध्ये कोणतीही कोरोनाची प्रकरणे आढळली नव्हती. जेव्हा आयपीएलचे सामने दिल्ली आणि अहमदाबादला सुरु झाले तेव्हा ही प्रकरणे वाढली. लोक कोणत्याही गोष्टीबद्दल अनेक गोष्टी बोलतात. इंग्लिश प्रीमीयर लीगमध्ये अनेक लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, पण त्यांना सामने हलवणे शक्य होते. पण आयपीएलबाबत आपण असे करु शकत नाही. तुम्ही सात दिवसांसाठी थांबू शकता आणि मग काहीच नाही. खेळाडू घरी जातात आणि परत सुरुवातीपासून क्वारंटाईनची प्रक्रिया सुरु होते.’
भारताला इंग्लंड दौऱ्यात १८ ते २२ जून दरम्यान साऊथँम्पटन येथे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर भारताला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळायची आहे. या कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून सुरु होणार असून १४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे जुलैमध्ये भारतीय संघ श्रीलंका दौरा करु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –