सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार होता. त्याने भारतीय संघाला परदेशात जिंकण्याची शिकवण दिली असे म्हणतात. त्याच्या संघात दिग्गज खेळाडू होते. तर सध्याच्या भारतीय संघातही अनेक दिग्गज खेळाडू आहेत. सौरव गांगुलीने सांगितले आहे की तो सध्याच्या भारतीय संघातील कोणत्या 5 खेळाडूंना आपल्या संघात निवडेल.
बीसीसीआयच्या संकेतस्थळावर ‘ओपन नेट्स विथ मयंक’ शोमध्ये सौरव गांगुलीला सध्याच्या भारताच्या कसोटी संघामधील ५ खेळाडू निवडण्यास सांगितले. भारतीय संघाचा सलामीवीर मयंक अग्रवाल याच्या प्रश्नाचे उत्तर देताना सौरव गांगुली म्हणाला, हा एक अतिशय कठीण प्रश्न आहे, कारण प्रत्येक पिढीचे खेळाडू वेगळे असतात.
सध्याच्या संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा माझ्या संघात असावेत असे मला वाटते. मी तुम्हाला नाही घेणार, कारण माझ्याकडे वीरेंद्र सेहवाग होता. तसेच जसप्रीत बुमराहची निवड करीन कारण दुसर्या बाजूला माझ्याकडे झहीर खान होता. जवागल श्रीनाथच्या निवृत्तीनंतर मी मोहम्मद शमीचीही निवड करीन. माझ्या संघात हरभजन सिंग आणि अनिल कुंबळेसारखे फिरकीपटू होते, त्यामुळे आर अश्विन तिसर्या फिरकीपटूच्या रूपात माझ्या संघात असेल. मला रवींद्र जडेजा देखील संघात आवडेल.
२००३ च्या विश्वचषक संघात विराट, रोहित आणि बुमराहची निवड करेन
सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००३ च्या विश्वचषकात उत्तम कामगिरी करत अंतिम सामान्यांपर्यंत मजल मारली होती. त्याचबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१९ च्या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
‘ओपन नेट्स विथ मयंक’ शोदरम्यान गांगुलीला २०१९ च्या विश्वचषक संघातील ३ खेळाडूंना २००३ च्या विश्वचषक संघासाठी निवडण्यास सांगितले, यावर सौरव गांगुली म्हणाला, तो विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांची निवड करेल. रोहित शर्मा वरच्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि मी तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करेन.
वीरेंद्र सेहवाग जर हे ऐकत असेल तर उद्या मला कॉल करेल आणि या बद्दल विचारेल. पण मी माझ्या संघासाठी या तीन खेळाडूंची निवड करेन.