इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये भारताचा युवा फलंदाज केएल राहुल याने किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाचं नेतृत्व केलं. त्याने त्याच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. एवढेच नाही, तर या हंगामात 670 धावा करून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीही त्याच्या नेतृत्वामुळे प्रभावित झाला आहे. बरोबर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला गांगुलीने एक सल्ला दिला आहे. तो इंडिया टुडे या चॅनेलवरील ‘इन्स्पिरेशन’ या कार्यक्रमात बोलत होता
केएल राहुल भारताला जिंकवून देऊ शकतो सामना
केएल राहुलच्या नेतृत्वामुळे गांगुली प्रभावित झाला आहे. गांगुलीचा असा विश्वास आहे की कर्नाटकचा हा खेळाडू कसोटी क्रिकेटसाठीच बनला आहे. याबद्दल बोलताना गांगुली म्हणाला की, मी एक क्रिकेटपटू म्हणून सांगात आहे की केएल राहुलकडे कसोटी सामन्यांसाठी बराच वेळ आहे. मात्र, संघात कोण असेल आणि कोण नसेल याचा निर्णय निवडकर्त्यांनी घेतला आहे. आयपीएलमधील राहुलच्या मोठ्या खेळीनंतरही काही सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबला विजय मिळवता आला नाही. भारताकडून खेळताना तो सामना जिंकवून देऊ शकतो.”
क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात देऊ शकतो योगदान
“कोणत्याही अनुभवी खेळाडूप्रमाणे मलाही विश्वास आहे की तो असा खेळाडू आहे जो क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात योगदान देऊ शकतो. मी त्याला शुभेच्छा देतो. आशा आहे की, तो भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात आपले योगदान देईल. ही महत्वाची बाब आहे.“असेही पुढे बोलताना गांगुली म्हणाला.
भारताबाहेर संघाला करावी लागेल चांगली कामगिरी
भारतीय संघ नोव्हेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ कसोटी, वनडे आणि टी20 या तीनही प्रकारच्या सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलताना गांगुली म्हणाला की, “विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. भारताबाहेर चांगली कामगिरी करावी लागेल ही गोष्ट विराटला समजून घ्यावी लागेल. या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची (सन 2018-19) मालिका जिंकली होती. परंतु दक्षिण आफ्रिका, इंग्लंड (सन 2018 ) आणि न्यूझीलंड (2020) मध्ये त्याला चांगली कामगिरी करायला हवी होती.”