ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर माजी कर्णधार सौरभ गांगुलीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाबद्दल त्याने भारतीय फलंदाजांना जबाबदार धरले. “तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये 200 धावाही पार करु शकत नसाल, तर तुम्ही जिंकणार कसे?” अशा शब्दांत त्याने भारतीय फलंदाजावर ताशेरे ओढले आहेत.
सौरभ गांगुली ‘इंडिया टूडे’शी बोलताना म्हणाला , “आम्ही चांगली फलंदाजी करण्यात कमी पडलो. आम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये आणखी चांगली कामगिरी करावी लागेल.” तो पुढे फलंदाजांना उद्देशून म्हणाला,” जर तुम्ही चांगली कामगिरी केली नाही, तर तुम्हाला कसोटी सामना जिंकता येणार नाही. केवळ 170 -180 धावा करुन तुम्हाला कसोटी जिंकता येणार नाही. यासाठी किमान 350-400 धावा कराव्या लागतील. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.”
सिडनी कसोटीत भारतीय संघाला 200 धावांचा आकडा एकदाही पार करता आला नाही. टीम इंडियाने पहिल्या डावात 185, तर दुसऱ्या डावात केवळ 157 धावा केल्या. याच कारणामुळे भारताला हा सामना जिंकता आला नाही. भारताने ही बॉर्डर-गावस्कर मालिका 3-1 ने गमावली. भारतासाठी या दौऱ्याची सुरुवात अप्रतिम राहिली होती. पर्थ मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विराट कोहली आणि यशस्वी जयस्वालच्या वादळी शतकसह 185 धावांनी विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ॲडलेड आणि मेलबर्न कसोटी जिंकून पुनरागमन केलं. ब्रिस्बेन येथील कसोटी पावसामुळे ड्रॉ झाली होती.
अखेरच्या सिडनी कसोटीत टीम इंडियाची सुरुवात शानदार झाली. यष्टीरक्षक रिषभ पंतने सिडनीच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर आक्रमक अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे भारतीय ड्रेसिंग रूममध्ये सकारात्मकता आली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा या कसोटीत बाहेर बसला होता. टीम इंडियाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपविण्यात आली होती. परंतु बुमराह दुसऱ्या दिवशी दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला. त्यानंतर संघाचे नेतृत्व विराट कोहलीने केले. या सामन्यात भारताचा 6 गडी राखून पराभव झाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म खूपच खराब राहीला. त्यानं या मालिकेत केवळ 38 धावा केल्या. आश्चर्याचं म्हणजे, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मालिकेत रोहितपेक्षा अधिक धावा (42) केल्या. त्यामुळे रोहितला चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले.
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया अडचणीत? शमीनंतर बुमराहच्या दुखापतीमुळे टेन्शन वाढलं!
BGT 2025 नंतर 16 दिवसांचा ब्रेक, 22 जानेवारीपासून भारत या देशाचे यजमानपद भूषवणार; पाहा वेळापत्रक
टीम इंडीयाचे पुढील WTC वेळापत्रक कसे? कधी कोणाशी रंगणार सामना? पाहा सर्वकाही